अंधेरीतील दोन वेगवेगळ्या अपघातात तरुणीसह महिलेचा मृत्यू
मद्यपी मित्राच्या बाईकवरुन प्रवास करणे तरुणीच्या जिवावर बेतले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ मार्च २०२४
मुंबई, – अंधेरीतील दोन वेगवेगळ्या अपघाताच्या एका २१ वर्षांच्या तरुणीसह महिलेचा मृत्यू झाला. निकिता विरु सिंग (२१) आणि शांता गौतम मगरे (५१) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी एमआयडीसी आणि साकिनाका पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन एका बाईकस्वाराला अटक केली तर दुसर्या वाहनचालकाचा पोलीस शोध घेत आहे. मद्यपी मित्राच्या बाईकवरुन प्रवास करणे निकिता सिंग या तरुणीच्या जिवावर बेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
४५ वर्षांची तक्रारदार महिला ही अंधेरी येथे राहत असून ती होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. तिचे पती लेबरचे काम करतात तर मृत निकिता हिच्यासह तिला अन्य दोन मुले आहेत. १६ मार्चला सकाळी साडेपाच वाजता निकिता ही तिचे दोन मित्र आदेश विजय देवळेकर आणि सुरज सिंग यांच्यासोबत बाईकवरुन साकिनाका येथून सिप्झच्या दिशेने जात होती. ही बाईक अंधेरीतील एमआयडीसी, सेंट्रल रोड, आकुर्ती स्टारसमोर येताच आदेशचा बाईकवरील नियंत्रण सुटले आणि त्याने डिवायडरला जोरात धडक दिली होती. त्यात निकिता ही गंभीररीत्या जखमी झाली होती. तिला जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धव घेतली होती. आदेशची मेडीकल केल्यानंतर त्याने मद्यप्राशन केले होते. मद्यप्राशन करुन त्याने भरवेगात बाईक चालविण्याचा प्रयत्न केला, त्यात त्याचे नियंत्रण सुटले आणि त्याने डिवायडरला धडक दिली होती. त्यामुळे निकिताच्या जिवावर बेतले. अपघाताला आदेश हाच जबाबदार असल्याने त्याला नंतर पोलिसांनी अटक केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले.
दुसरा अपघात शनिवारी दुपारी पाऊणच्या सुमारास साकिनाका येथील खैराणी रोड, साईबाबा मंदिरासमोर झाला. मृत शांता मगरे ही महिला घाटकोपरच्या भटवाडी, पितामह रामजीनगर परिसरात राहत होती. ती खैराणी रोडवर भंगाार गोळा करण्याचे काम करत होती. शनिवारी सकाळी सव्वासात ती नेहमीप्रमाणे कामावर निघून गेली. दुपारी ती साईबाबा मंदिरासमोरुन जात होती. यावेळी भरवेगात जाणार्या एका अज्ञात वाहनाने तिला धडक दिली होती. या अपघातात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच तिच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान रविवारी रात्री उशिरा शांता हिचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिचा मुलगा किशोर गौतम मगरे याच्या तक्रारीवरुन साकिनाका पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. अपघातानंतर आरोपी चालक तिला वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून गेला होता, त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.