पार्टटाईम जॉबची ऑफर देऊन विविध टास्कद्वारे फसवणुक
अज्ञात सायबर ठगांकडून तीन महिलांना २३ लाखांना गंडा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ मार्च २०२४
मुंबई, – पार्टटाईम जॉबची ऑफर देऊन जास्त कमिशनसह परतावा देण्याचे आमिष दाखवून विविध प्रिपेड टास्कद्वारे तीन महिलांची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे २३ लाखांची फसवणुक केल्याची घटना मालाड आणि अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी मालाड आणि एमआयडीसी पोलिसांनी तीन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हे दाखल करुन तपास सुरु केला आहे. या तिन्ही गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
३० वर्षांचा तक्रारदार तरुण अंधेरी येथे राहत असून मालाड येथील एका खाजगी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. त्याने नवीन नोकरीसाठी एका वेब पोर्टलवर स्वतचा अर्ज सादर केला होता. १३ मार्चला त्याला एका पार्टटाईम जॉबचा मॅसेज आला होता. या मॅसेजसोबत एक लिंक होती. त्यात रिव्हयू देण्याचे टास्क होते. ते टास्क पूर्ण केल्यास त्याला चांगले कमिशन मिळेल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याने ते टास्क पूर्ण केले होते. प्रत्येक टास्कमागे त्याला दिडशे रुपयांचे कमिशन मिळाले होते. त्यानंतर त्याला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये सामिल करण्यात आले. तिथे त्याला अंजली राठोड या महिलेने काही प्रिपेड टास्क देताना त्याला जास्त कमिशन मिळेल असे सांगितले होते. त्यामुळे दोन हजार रुपयांचा एक टास्क पूर्ण केला असता त्याच्या खात्यात २८०० रुपये जमा झाले होते. त्यानंतर अशाच प्रकारे विविध टास्कद्वारे पैसे गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. एका टास्कमध्ये त्याला पाच रुपये गुंतवणुक करण्यास सांगून तिने टास्क पूर्ण केल्यावर साडेतेरा लाख रुपये मिळतील असे सांगितले. त्यामुळे त्याने पाच लाख रुपये गुंतवणुक हा टास्क पूर्ण केला होता. यावेळी त्याच्या अकाऊंटमध्ये १३ लाख ४० हजार रुपये जमा झाल्याचे दिसून आले. मात्र त्याला अकाऊंटमधून पैसे काढता येत नव्हते. त्यासाठी विविध चार्जेस म्हणून पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्याने काही रक्कम ट्रान्स्फर केली होती. अशा प्रकारे त्याने टास्क पूर्ण करण्यासाठी तसेच अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी १३ मार्च ते १६ मार्च २०२४ या काावधीत ९ लाख ३५ हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र ही रक्कम जमा करुनही त्याला त्याची मुद्दलसह कमिशनची रक्कम मिळाली नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्याने मालाड पोलिसांत तक्रार केली होती.
दुसर्या घटनेत एका ३३ वर्षांच्या महिलेची पावणेनऊ लाखांची फसवणुक झाली. ही महिला अंधेरी येथे राहत असून तिचे पती शेअर मार्केटमध्ये सल्लागार म्हणून काम करतात. मुलगी दिड वर्षांची असल्याने ती ऑनलाईन नोकरीच्या शोधात होती. याच दरम्यान तिला इंटाग्रामवर ऑनलाईन नोकरीसंदर्भात एक जाहिरात दिसली होती. तिने ती लिंक ओपन केली होती. यावेळी लिझा नावाच्या एका महिलेने तिला तिच्या कंपनीत मिडीया आणि बॉल्गर यांचे फॉलोअर वाढविण्यासाठी पार्टटाईम जॉबची ऑफर दिली होती. प्रत्येक टास्कमध्ये तिला पन्नास रुपयांचे कमिशनचे आमिष दाखविण्यात आले ोते. त्यामुळे तिने विविध व्हिडीओ लाईक करुन तिचे टास्क पूर्ण केले होते. त्यानंतर तिला टेलिग्राम ग्रुपमध्ये सामिल करुन जास्त कमिशनचे काही प्रिपेड टास्क देण्यात आले होते. या टास्कसाठी तिने काही रक्कमेची गुंतवणुक केली होती. यावेळी तिला भरपूर फायदा होत असल्याचे दिसून आले होते, मात्र ही रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यासाठी समोरील व्यक्ती तिच्याकडून पैशांची मागणी करत होते. त्यामुळे तिने अडीच लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र ही रक्कम ट्रान्स्फर करुनही तिला आणखीन साडेसहा लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले होते. विविध प्रिपेड टास्क, मुद्दलसह कमिशनची रक्कम मिळविण्यासाठी तिने पावणेनऊ लाख रुपये विविध बँक खात्यात ट्रान्स्फर केले होते. तरीही तिला पैसे मिळाले नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती.
अशाच अन्य एका घटनेत एका ४६ वर्षांच्या महिलेची सव्वापाच लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही महिला तिच्या आई-वडिल भावासोबत बोरिवली परिसरात राहते. ती पूर्वी शिक्षिका म्हणून काम करत होती. १ मार्च ते ३ मार्च २०२४ या कालावधीत तिला अज्ञात सायबर ठगांनी टेलिग्रामवर विविध टास्कसाठी पार्टटाईम जॉबची ऑफर दिली होती. या टास्कद्वारे तिला चांगला परतावा मिळेल असे सांगण्यात आले. त्यांच्या आमिषाला बळी पडून तिने विविध टास्कसाठी सव्वापाच लाख रुपये भरुन ते टास्क पूर्ण केले होते. मात्र तिला कुठलाही परतावा न देता या ठगांनी तिची फसवणुक केली होती. या घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी दोन स्वतंत्र फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.