पूर्ववैमस्नातून 20 वर्षांच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या
सोळा वर्षांच्या आरोपी मुलाची बालसुधारगृहात रवानगी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 मार्च 2025
मुंबई, – पूर्ववैमस्नातून अनियंत हेमेंद्र सिंग या 20 वर्षांच्या तरुणाची त्याच्या परिचित सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना मालाड येथे घडली. याप्रकरणी मालाड पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. हत्येच्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.
ही घटना बुधवारी रात्री उशिरा एक वाजता मालाड येथील गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, ऑरेज मेडीकलसमोर घडल्याचे पोलिसांनी सांगितले. धिरु वसंत सिंग हा याच परिसरातील वासरी हिल चाळीत राहत असून चालक म्हणून कामाला आहे. अल्पवयीन मुलगा याच परिसरात राहत असल्याने ते एकमेकांच्या परिचित आहेत. काही दिवसांपूर्वी धिरुचा लहान भाऊ अनियंत आणि आरोपी मुलामध्ये क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. त्याचा आरोपीच्या मनात राग होता. बुधवारी रात्री उशिरा याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. यावेळी त्याने अनियंत याच्यावर चाकूने वार केले होते. त्यात त्याच्या डोक्याला, पोटाला, पाठीला, मानेवर आणि कंबरेवर गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी धिरु सिंग याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याने पूर्ववैमस्नातून अनियंतची चाकूने भोसकून हत्या केल्याची कबुली दिली. अल्पवयीन असल्याने त्याला नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.