मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 एप्रिल 2025
मुंबई, – कसे चालू आहे अशी विचारणा केली म्हणून रागाच्या भरात दोघांवर त्यांच्याच परिचित आरोपीने लाकडी बॅटसह बिअरच्या बॉटलने प्राणघातक हल्ला केल्याची घटना अॅण्टॉप हिल परिसरात घडली. या हल्ल्यात माधवन नाडर जोसेफ आणि त्याचा मित्र नित्या देवेंद्र जखमी झाले असून त्यांच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अॅण्टॉप हिल पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून कार्तिक रजा देवेंद्र या 26 वर्षांच्या आरोपीस हल्लेखोराला अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना सोमवारी 7 एप्रिलला रात्री दोन वाजता अॅण्टॉप हिल येथील रावळी कॅम्प, विष्णू चाळीत घडली. याच परिसरात माधवन आणि कार्तिक हे दोघेही राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. सोमवारी रात्री माधवन हा त्याचा मित्र नित्या देवेंद्रसोबत परिसरात गप्पा मारत बसला होता. काही वेळानंतर तेथून कार्तिक हा जात होता. यावेळी त्याला पाहून त्याने कार्तिकला त्याचे कसे चालू आहे अशी विचारणा केली होती. याच कारणावरुन त्याने त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली होती. रागाच्या भरात कार्तिकने माधवन आणि नित्यावर बॅटसह बिअरच्या बॉटलने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती.
हा प्रकार निदर्शनास येताच स्थानिक रहिवाशांनी हल्ला जखमी झालेल्या दोघांनाही तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच अॅण्टॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी माधवनची चौकशी केल्यानंतर घडलेला प्रकार उघडकीस आला. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कार्तिकविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या कार्तिकला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात कार्तिक आणि माधवन हे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. कॉलेजमध्ये असताना त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. या भांडणाचा रागही कार्तिकच्या मनात होता. त्यात त्याला पाहून माधवन कसे चालले आहे अशी विचारणा केली म्हणून त्याचा राग अनावर झाला आणि त्याने त्याच्यासह त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.