अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंगप्रकरणी वर्गमित्रावर गुन्हा दाखल
कॉलेजच्या व्हॉटअप ग्रुपवर इमोजीच्या वादातून घडलेला प्रकार
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 एप्रिल 2025
मुंबई, – कॉलेजच्या मित्र-मैत्रिणीच्या व्हॉटअप ग्रुपवर इमोजीवरुन झालेल्या वादातून एका विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गातील सोळा वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील शिवीगाळ करुन तिचा मानसिक शोषण करुन विनयभंग केल्याची घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी विद्यार्थ्याविरुद्ध निर्मलनगर पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याची पोलिसांकडून चौकशी होणार आहे.
बळीत सोळा वर्षांची मुलगी तिच्या पालकांसोबत वांद्रे परिसरात राहते. ती सध्या अकरावीत शिकत असून आरोपी तिच्याच वर्गात शिकतो. त्यांचा कॉलेजच्या मित्र-मैत्रिणीचा एक व्हॉटअप ग्रुप आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या एका मित्राने ग्रुपवर एक इमोजी टाकला होता. त्यावर तिने उलटी असलेला इमोजी टाकून त्याला रिप्लाय दिला होता. त्याचा आरोपी राग आला म्हणून त्याने 2 एप्रिल ते 7 एप्रिल 2025 या कालावधीत तिला व्हॉटअप कॉल, व्हाईस कॉल आणि चॅट करुन अश्लील शिवीगाळ केली होती. तिचा मानसिक शोषण करुन तिचा विनयभंग केला होता. आरोपी विद्यार्थ्याने दुसर्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलचा वापर केल्याचे नंतर उघडकीस आले होते.
हा प्रकार नंतर तिने तिच्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी निर्मलनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. इमोजीवरुन झालेल्या वादानंतर आरोपीने पाठविलेले व्हॉईस कॉल, चॅट आणि कॉलचे स्क्रिनशॉट तिने कॉलेज प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कॉलेज प्रशासनाकडून लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे बोलले जाते.