बोगस पासपोर्टवर विदेशातून आलेली बांगलादेशी महिला गजाआड
दिल्ली-दुबई ते दुबई-मुंबई प्रवास केल्याचे तपासात उघडकीस
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ मार्च २०२४
मुंबई, – अठरा वर्षांपूर्वी बांगलादेशातून भारतात अवैधरीत्या प्रवेश करुन एका भारतीय नागरिकाशी विवाह केल्यानंतर त्याच्या नावाने बोगस भारतीय पासपोर्ट बनवून विदेशात गेल्यानंतर चार वर्षांनी मुंबईत परत आलेल्या एका बांगलादेशी महिलेस छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहार पोलिसांनी अटक केली. नसीमाबेगम मोहम्मद इंद्रीस शेख असे या महिलेचे नाव असून तिच्याविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन भारतीय पासपोर्ट मिळवून पासपोर्ट अधिकार्यांची फसवणुक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. चार वर्षांत नसीमाबेगमने दिल्ली-दुबई आणि दुबई-मुंबई असा प्रवास केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रमाकांब राजकिशोर बसंतराय हे ऍण्टॉप हिल येथे राहत असून आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विदेशातून आलेल्या प्रवाशांच्या इमिग्रेशन तपासणीच्या कामाची त्यांच्यावर होती. रात्री उशिरा अडीच वाजता नसीमाबेगम ही महिला दुबईतून मुंबईत आली होती. तिच्या पासपोर्टसह बोर्डिंग पासच्या तपासणीदरम्यान तिचे पासपोर्ट बिहारच्या बरेली येथून जारी करण्यात आल्याचे दिसून आले. मात्र या पासपोर्टवर तिचा जन्मतारीख कोलकाता शहराची होती. त्यामुळे तिच्याकडे तिच्या जन्मस्थानासह भौगोलिक परिसराबाबत विचारणा केली असता तिला समाधानकारक उत्तर देता आले नाही. तिच्या बोली भाषेवरुन ती बांगलादेशी नागरिक असल्याचा त्यांना संशय आला होता. त्यामुळे तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान तिने ती बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. तिला बांगलादेशी नागरिक असल्याचे पुराव्याबाबत विचारणा केल्यानंतर तिने बांगलादेशातील तिच्या कुटुंबियांकडून काही दस्तावेज मागवून घेतले होते. या कागदपत्रांची पाहणी केल्यानंर तिचे नाव नसीमाबेगम, पतीचे नाव इब्राहिम, वडिलांचे नाव मोहम्मद इद्रीसमियॉं आणि आईचे नाव शुहेदाबेगम असल्याचे उघडकीस आले.
२००७ साली ती बांगलादेशातून भारतात पळून आली होती. भारतात आल्यानंतर तिने वसीम नावाच्या एका व्यक्तीसोबत विवाह केला होता. त्यानंतर त्याच्या नावाने तिने पॅनकार्ड, आधारकार्डसह इतर भारतीय नागरिक असल्याचे पुरावे जमा केले होते. या कागदपत्रांच्या आधारे २०२१ साली तिने भारतीय पासपोर्ट मिळविला होता. तिला दुबईत नोकरीसाठी जायचे होते. त्यामुळे ती २० नोव्हेंबर २०२१ रोजी दिल्ली विमानतळावरुन दुबईला गेली. चार वर्ष तिथे काम केल्यानंतर ती २० मार्चला रात्री उशिरा दुबईहून मुंबईत आली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर तिला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी इमिग्रेशन अधिकारी रमाकांत बसंतराय यांच्या तक्रारीवरुन तिच्याविरुद्ध पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत तिला नंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला गुरुवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.