हेव्ही डिपॉझिटवर दिलेल्या फ्लॅटची विक्री करुन फसवणुक
दहा लाखांना गंडा घालणार्या फ्लॅटमालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 एप्रिल 2025
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटवर दिलेल्या फ्लॅटची परस्पर विक्री करुन एका व्यक्तीची दहा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी फ्लॅटमालक सिद्धीक अल्ताफ अहमद सागीर आलम याच्याविरुद्ध चुन्नाभट्टी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच सिद्धीक हा पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
मुस्ताक अब्दुल हमीद साखरकर हे चेंबूर येथे राहत असून ते माझगाव डॉक येथे नोकरी करतात. मे 2021 रोजी ते चांगल्या फ्लॅटच्या शोधात होते. याच दरम्यान त्यांची सिद्धीक आलमशी ओळख झाली होती. त्याने त्याचा कुर्ला येथील बंटर भवनजवळील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सोळाव्या मजल्यावर एक फ्लॅट असून तो फ्लॅट त्याला हेव्ही डिपॉझिटवर द्यायचा आहे असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी त्या फ्लॅटची पाहणी केली होती. तिथे एक भाडेकरु राहत होता. फ्लॅट पसंद पडल्याने त्यांनी सिद्धीक आलमकडून त्याच्या फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर घेण्याचे ठरविले होते. यावेळी सिद्धीकने त्यांना तीन महिन्यांत फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते.
फ्लॅटबाबात सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी त्याला तीन टप्यात दहा लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्यांच्यात फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर देण्याबाबत एक करार झाला होता. मात्र तीन महिने उलटूनही त्याने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. तो वेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. मार्च 2022 रोजी ते सिद्धीकला भेटण्यासाठी गेल्यानंतर त्याने भाडेकरुला दुसर्या ठिकाणी अद्याप फ्लॅट मिळाला नसल्याचे सांगून आणखीन काही दिवस थांबण्याचा सल्ला दिला होता.
याच दरम्यान सिद्धीक त्यांना कुठलीही माहिती न देता गावी निघून गेला होता. त्यामुळे ते त्याच्या फ्लॅटमध्ये गेले होते. यावेळी त्यांना सिद्धीकने परस्पर फ्लॅटची त्रयस्थ व्यक्तीला विक्री केल्याची माहिती समजली. त्यानंतर त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. त्याचा शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. हेव्ही डिपॉझिटसाठी दहा लाख रुपये घेऊन सिद्धीक आलमने परस्पर फ्लॅटची विक्री करुन त्यांची आर्थिक फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी चुन्नाभट्टी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून सिद्धीक आलमविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत सिद्धीक आलमला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.