चार विविध अपघातात अल्पवयीन मुलगा, वयोवृद्धासह चौघांचा मृत्यू
विक्रोळी, वांद्रे-मालाड येथील अपघातप्रकरणी स्वतंत्र एडीआरची नोंद
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 एप्रिल 2025
मुंबई, – शहरात चार विविध अपघाताच्या घटनेत एका सोळा वर्षांच्या मुलगा, वयोवृद्धासह चौघांचा मृत्यू झाल्याची घटना विक्रोळी, वांद्रे आणि मालाड परिसरात घडली. मृतांमध्ये दिनेश जैन या 52 वर्षीय भंगार व्यापारी, परम राजेश सोनी या सोळा वर्षांचा मुलगा, व्यकंटेश शहानबाग या 61 वर्षांच्या वयोवृद्धासह ओमकार नागेश कोलते या 38 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिद्धार्थ गणेश कांबळे, आदित्य नरेंद्र थापासह इतर दोन चालकांविरुद्ध हलगर्जीपणाचा विक्रोळी, वांद्रे आणि मालाड पोलिसांनी चार स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. याच गुन्ह्यांत सिद्धार्थ कांबळेला वांद्रे पोलिसांनी अटक केली तर इतर तीन चालकांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
पहिला अपघात मंगळवारी दुपारी पाऊणच्या सुमारास वांद्रे येथील हिल रोडवर झाला. रोमितकुमार हा सांताक्रुज येथे राहत असून मृत दिनेश हे त्याचे वडिल आहेत. त्यांचा वांद्रे येथील लकी हॉटेलसमोरील बडी मशिदीजवळ भंगार विक्रीचे दुकान आहे. सकाळी कामावर गेल्यानंतर ते दुपारी जेवणासाठी घरी येत होते. मंगळवारी दुपारी ते जेवणासाठी घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यांची बाईक हिल रोडवरुन जात असताना भरवेगात जाणार्या एका डंपरने त्यांच्या बाईकला धडक दिली होती. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना तातडीने वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. अपघाताची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी रोमितकुमार जैन याच्या तक्रारीवरुन वांद्रे पोलिसांनी डंपरचालक सिद्धार्थ गणेश कांबळे (26) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. सिद्धार्थ हा दहिसर येथील रावळपाडा परिसरात राहत असून डंपर चालक म्हणून कामाला होता.
दुसरा अपघात 7 एप्रिलला दुपारी पाऊणच्या सुमारास मालाड येथील वीर सावरकर फ्लायओव्हर, एमटीएनएल जंक्शनजवळ झाला होता. राजेश दिलीप सोनी हे मालाड येेराहत असून त्यांचे परमटुल्स नावाचे एक शॉप आहे. 6 एप्रिलला त्यांचा सोळा वर्षांचा मुलगा परम हा त्याचा मित्र आदित्य थापा, जय डाभी,, मनिष यादव, जयेश शेट्टी, विरु नाथ याच्यासोबत रामनवमीनिमित्त साजरी करण्यासाठी त्यांच्या बाईकवरुन गेले होते. यावेळी आदित्यसोबत परम हा बाईकवर होता. रॅश ड्रायव्हिंगच्या नादात आदित्यचा बाईकवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची बाईक स्लीप झाली होती. या अपघातात परम सोनी हा गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. दुसर्या परमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याच्यावर अंत्यसंस्कार आणि धार्मिक विधीसाठी संपूर्ण राजेश सोनी हे त्यांच्या गावी गेले होते. गावाहून परत येताच पंधरा दिवसानंतर त्यांनी मालाड पोलिसांत आदित्य थापाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाने बाईक चालवून एका सोळा वर्षांच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
विक्रोळीतील दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यातील पहिल्या अपघातात ओमकार नागेश कोलते या 28 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. ओमकार हा मानखुर्द येथे कामाला असून तो त्याच्या बाईकवरुन कामावर जातो. सोमवार सकाळी नऊ वाजता तो नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाला होता. यावेळी त्याच्या बाईकची एका बसला धडक लागून तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला गोदरेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी बसचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने बस पार्किंग करुन कोणतीही सुरक्षितता न पाळता, पार्किंग चिन्हाचा वापर न करता तसेच बसच्या क्लिनरला मागे उभा न करता अपघात घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
दुसर्या अपघातात व्यकंटेश शहानबाग या 61 वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाला. व्यकंटेश हे डोबिवलीचे रहिवाशी असून काळबादेवीतील कामत हॉटेलमध्ये कामाला वेटर म्हणून कामाला होते. एक आठवड्यापूर्वीच त्यांनी ते काम सोडले होते. 11 एप्रिलला सकाळी पाच वाजता भांडुप पंपिंग बसस्टॉपसमोर त्यांना एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती. सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या व्यकंटेश यांचा 18 एप्रिलला उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांचा अंत्यविधी आणि इतर विधी पूर्ण केल्यानंतर त्यांचा मुलगा रामनाथ शहानबाग यांनी विक्रोळी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने वाहन चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.