26/11 आत्मघाती हल्ल्याशी संबंध नाही – तहव्वूर हुसैन राणा
एनआयए कोठडीत राणाची गुन्हे शाखेकडून आठ तास चौकशी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
26 एपिल 2025
मुंबई, – मुंबई शहरात झालेल्या 26/11 आत्मघाती हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर हुसैन राणा सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पोलीस कोठडीत असून याच कोठडीत असताना त्याची मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुमारे आठ तास कसून चौकशी करण्यात आली आहे. या तपासात त्याने पोलिसांना सहकार्य केले नाही, आपला 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात संबंध नसल्याचा दावा करुन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. या संपूर्ण घटनेमागील मास्तरमाईंड त्याचा बालपणीचा मित्र डेव्हीड कोलमन हेडली हाच असून त्यानेच हा हल्ला घडवून आणल्याचे सांगितले. आपल्या बळीचा अकरा बनविण्यात आले आहे असेही सांगितले.
26 नोव्हेंबर 2008 रोजी समुद्रमार्गे आलेल्या पाक पृरस्कृत लष्कर-ए-तोयबाच्या दहा अतिरेक्यांनी मुंबई शहरात आत्मघाती हल्ला केला होता. एकाच वेळेस ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायटंड, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस, नरिमन हाऊस, कामा हॉस्पिटलसह इतर ठिकाणी दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात 166 निरपराध व्यक्तींना नाहक जीव गमवावा लागला तर अनेकजण जखमी झाले होते. यावेळी नऊ अतिरेक्यांचा खात्मा करण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणेला यश आले तर अजमल कसाब या अतिरेक्याला पकडण्यात यश आले होते. त्याच्या चौकशीतून या हल्ल्यामागील मुख्य सूत्रधारांची नावे उघडकीस आली होती. या हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचे सर्वप्रथम पुरावे राष्ट्रीय तपास यंत्रणेला समोर आणले होते. या कटात सहभागी असलेल्या तहव्वूर राणा याला अमेरिकेने अटक केली होती. तेव्हापासून तो अमेरिकेच्या ताब्यात होता.
अखेर दिर्घ कायदेशीर लढाईनंतर राणाचा ताबा भारताला सोपविण्यात आला होता. त्याचे प्रत्यार्पण होताच त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. याच गुन्ह्यांत तो सध्या एनआयए कोठडीत आहेत. त्याची चौकशी करण्याची विनंती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून करण्यात आली होती. या विनंतीनंतर त्याची चौकशी करण्याची परवानगी गुन्हे शाखेला देण्यात आली होती. बुधवारी गुन्हे शाखेचे चारजणांचे एक विशेष पथक दिल्लीत गेले होते. या पथकाने एनआयए कोठडीत असलेल्या राणाची सुमारे आठ तास कसून चौकशी केली. मात्र या चौकशीला राणाकडून पोलिसांना सहकार्य करण्यात आले नाही. या हल्ल्यात आपला काही संबंध नाही. आपल्याला बळीचा बकरा बनविण्यात आले आहे असे तो सतत सांगत होता. तपासात सहकार्य करत नसल्याने काही गोष्टींचा खुलासा करण्यात पोलिसांना यश आले नव्हते.
या संपूर्ण हल्ल्याचा मास्तरमाईंड डेव्हीड हेडली असून त्याने हल्ल्याचे नियोजन आणि अंमलबजावणी केली होती. त्याच्या सांगण्यावरुन राणा हा मुंबईसह दिल्ली, केरळ येथे गेला होता. या भेटीत तो त्याच्या परिचित लोकांना भेटला, त्याने हल्ल्यापूर्वी रेकी केली याचे खंडन केले होते. राणा हा केरळला गेल्याचे सांगत असल्याने मुंबई पोलीस लवकरच केरळला जाणार आहे. तिथे तो कोणाला भेटला याची माहिती काढली जाणार आहे. राणा हा अत्यंत शांत आणि हुशार व्यक्ती असल्याचे तपासात दिसून आले. तो शांतपणे पोलिसांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. नमाजासाठी तो वेळ मागत होता. राणाचा डेव्हीड हेडली हा बालपणीचा मित्र आहे. त्यानेच मुंबई शहरात दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात डेव्हीड हेडली ऊर्फ दाऊद गिलानी याला लष्कर-ए-तोयबा आणि हरकत-उल-जिहादी इस्लामी या पाकपृरस्कृत दहशतवादी संघटनेच्या मदत केली होती असेही राणाने पोलिसांना सांगितले.