शेअर ट्रेडिंगद्वारे झटपट फायद्याच्या आमिषाने पावणेतीन कोटींना गंडा
तीन सायबर ठगांना अटक; बोगस खाती उघडल्याचा तिघांवर आरोप
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
29 एप्रिल 2025
मुंबई, – शेअर ट्रेडिंगद्वारे झटपट फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची ऑनलाईन फसवणुक करणार्या एका टोळीचा उत्तर प्रादेशिक सायबर सेलच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत तीन सायबर ठगांना पोलिसांनी अटक केली असून या तिघांनी बोगस खाती उघडल्याचा आरोप आहे. त्यांनी उघडलेल्या बँक खात्यात 28 गुन्ह्यांतील सुमारे अठरा कोटी रुपये जमा झाल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस आले आहे. ऋषक मोहन शिरोडकर, कृष्णा अरुण गवळी आणि सोहेल नाझीर अहमद शेख ऊर्फ जँक अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
49 वर्षांचे तक्रारदार गोरेगाव परिसरात राहत असून व्यवसायाने व्यावसायिक आहेत. 17 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 या कालावधीत अज्ञात व्हॉटअप ग्रुपच्या माध्यमातून त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. हा ग्रुप एका बोगस कंपनीचा असून कंपनीने ते सेबी रजिस्ट्रर नोंदणी कंपनी असल्याचा दावा केला होता. शेअर ट्रेडिंगद्वारे भरपूर फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना गुंतवणुकीसाठी भाग पाडण्यात आले. गुंतवणुकीनंतर त्यांना चांगला प्रॉफिट झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी काही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला.
मात्र ही रक्कम ट्रान्स्फर करण्यासाठी त्यांच्याकडे विविध टॅक्सची रक्कम जमा करावी लागेल असे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी टॅक्सची रक्कम भरणा केली होती. अशा प्रकारे या टोळीने त्यांच्याकडून शेअर टे्रडिंगसह टॅक्ससाठी 2 कोटी 77 लाख रुपये घेतले होते, मात्र कुठलाही परतावा दिला नाही किंवा मूळ रक्कमही दिली नव्हती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी उत्तर सायबर सेल विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.
तांत्रिक माहितीवरुन पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या पथकातील प्रभारी पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे, पोलीस निरीक्षक किरण आहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाचांगणे, पोलीस उपनिरीक्षक धनवेश पाटील, महिला पोलीस हवालदार प्राची मुळीक, पोलीस हवालदार उतेज परब, किरण वसईकर, पोलीस शिपाई हबीब सय्यद, गायकवाड यांनी तिन्ही संशयितांना शनिवारी वांद्रे येथून ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत या तिघांचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
तिन्ही आरोपींना रविवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी चार मोबाईल, विविध बँकेचे धनादेश, डेबीट कार्ड जप्त केले आहेत. या आरोपींनी विविध बँकेत बोगस कंपनीच्या नावाने करंट खाते उघडले होते. याच बँक खात्यात 71 लाख 22 हजार 999 रुपये जमा झाले होते.
या टोळीचा ऋषक हा मुख्य आरोपी असून त्यानेच संबंधित खाते उघडले होते तर इतर दोघांनी त्याला मदत केली होती. या रक्कमेची तिघांनी नंतर विल्हेवाट लावली होती. याच बँक खात्यात देशभरातील 28 गुन्ह्यांतील सुमारे अठरा कोटी रुपये जमा झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या गुन्ह्यांची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.