घाटकोपर येथे 35 वर्षांच्या तृतीयपंथीवर लैगिंक अत्याचार
पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
29 एप्रिल 2025
मुंबई, – मेडीकलमधून गोळी घेऊन घरी जाणार्या एका तृतीयपंथीवर अज्ञात व्यक्तीने लैगिंक अत्याचार करुन तिक्ष्ण हत्याराने हल्ला केल्याची घटना घाटकोपर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी कृष्णा नावाच्या एका संशयित आरोपीसह त्याच्या मित्राविरुद्ध पार्कसाईट पोलिसांनी तृतीयपंथी अधिनियम आणि भान्यास कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या आरोपींचा परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांकडून शोध सुरु आहे. लैगिंक अत्याचारासह तिक्ष्ण हत्याराने केलेल्या हल्ल्यात पिडीत तृतीयपंथी जखमी झाला असून त्याच्यावर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना सोमवारी रात्री तीन वाजता घाटकोपर येथील अमृतनगर, सव्ह्रिस सेंटर, मज्जीद गल्ली परिसरात घडली. 35 वर्षांचा तक्रारदार तृतीयपंथी असून तो विक्रोळीतील पार्कसाईट परिसरात राहतो. लोकलमध्ये तो पैसे मागण्याचा काम करतो. सोमवारी त्याचे डोक दुखत होते, त्यामुळे तो गोळी घेण्यासाठी त्याच्या मैत्रिणीकडे घाटकोपर येथील अमृतनगर येथे गेला होता. एका मेडीकल दुकानात गोळी घेतल्यानंतर रात्री तीन वाजता तो रस्त्याच्या कॉर्नरजवळील सर्व्हिस रोडने पायी जात होता. यावेळी तिथे दोन तरुण मद्यप्राशन करत होते. या तरुणांनी त्याच्या मैत्रिणीला विनाकारण धक्का देऊन मारहाण करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे त्याने मध्यस्थी करुन त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रयत्नात त्याची मैत्रिण तेथून पळून गेली तर त्याला या दोघांनी पकडून ठेवले होते. त्यांनी त्याला जबदस्तीने दारु पिण्यास प्रवृत्त केले. त्यात त्याला चक्कर आली आणि तो तिथे कोसळला होता. काही वेळानंतर त्यांनी त्याला एका कारजवळ आणले आणि त्याला त्याच्या जातीविषयी विचारणा सुरु केली होती. मात्र दारु प्यायल्याने त्याला फारसे बोलता येत नव्हते. याच दरम्यान कृष्णा नावाच्या एका व्यक्तीने त्याच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. या अत्याचारानंतर ते दोघेही पळून गेले होते. मद्यप्राशानामुळे त्याला ठिक चालता येत नव्हते. त्यामुळे तो तिथेच पडून राहिला होता. शुद्ध आल्यानंतर त्याला त्याच्या डाव्या हातातून रक्त येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला संबंधित व्यक्तीने त्याच्यावर लैगिंक अत्याचार तिक्ष्ण हत्याराने हातावर दुखापत केल्याचे समजले.
पहाटे पाच वाजता त्याने त्याच्या मैत्रिणीसह बहिणीला घडलेला प्रकार सांगून तिथे बोलावून घेतले होते. त्यानंतर ते दोघेही तिथे आले आणि त्यांनी त्याला तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची मेडीकल करण्यात आली आहे. ही माहिती मिळताच पार्कसाईट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कृष्णा नावाच्या आरोपीविरुद्ध 18 (डी) तृतीयपंथी व्यक्ती अधिनियम आणि 118 (2) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.