मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 मे 2025
मुंबई, – डंपरच्या धडकेने अशोक श्रीधर डांगे या 58 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी गोरेगाव परिसरात घडली. याप्रकरणी आरे पोलिसांनी अपघाताची नोंद करुन अपघातानंतर पळून गेलेल्या डंपरचालकाचा शोध सुरु केला आहे. डंपरचा टायर डोक्यासह शरीरावरुन गेल्याने अशोक डांगे यांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा अपघात बुधवारी दुपारी पावणेदोन वाजता गोरेगाव येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, आरे ब्रिजवरील सर्वोदयनगर बुद्ध विहार समोरील जोगेश्वरीकडे जाणार्या रस्त्यावर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सिद्धेश अशोक डांगे हा जोगेश्वरीतील मेघवाडी, सुभद्रा निवास अपार्टमेंटमध्ये राहत असून सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. मृत अशोक हे त्याचे वडिल असून ते जोगेश्वरीतील एलआयजी कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. या कामासोबत ते दिवसा मालाड येथून माल खरेदी करुन तो माल बिझनेससाठी तयार करुन मालाडच्या कार्यालयात जमा करण्याचे काम करत होते.
बुधवारी दुपारी पावणेदोन वाजता ते त्यांच्या बाईकवरुन मालाड येथून जोगेश्वरीच्या दिशेने येत होते. जोगेश्वरीकडे जाणार्या बुद्ध विहारसमोर त्यांची बाईक आली असता एका डंपरने त्यांच्या बाईकला जोरात धडक दिली. या अपघातात त्यांची बाईक स्लिप होऊन ते गंभीररीत्या जखमी झाले होते. डंपरचा टायर त्यांच्या डोक्यासह शरीरावरुन गेला होता. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते, त्यामुळे त्यांना तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
अपघाताची माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी सिद्धेश डांगे याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी डंपरचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून एका 58 वर्षांच्या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर डंपरचालक जखमी व्यक्तीला वैद्यकीय उपचार तसेच अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.