ट्रिपल सीट जाणार्या तरुणांकडून पोलिसांशी उद्धट वर्तन
गोरेगाव येथील घटना; तिन्ही तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ ऑगस्ट २०२४
मुंबई, – बाईकवरुन ट्रिपल सीट जाणार्या बाईकस्वारावर कारवाई करताना तरुणांनी कर्तव्य बजाविणार्या पोलीस हवालदाराशी उद्धट वर्तन करुन शिवीगाळ करुन हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी तिन्ही आरोपी तरुणांविरुद्ध आरे पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राजू प्रकाश यादव, सुमित रामसिजारे यादव आणि निरज सुरेंद्र यादव अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांनाही कलम ३५ (३) कलमांतर्गत नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.
ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजता गोरेगाव येथील आरे कॉलनी,वायरलेस कंपाऊंड चौक परिसरात घडली. प्रसाद दत्ताराम महाडिक हे भांडुपच्या महाराष्ट्रनगर, साई निवासमध्ये राहत असून दिडोंशी वाहतूक पोलीस चौकीत पोलीस हवालदार म्हणून काम करतात. बुधवारी सकाळी ते त्यांच्या सहकारी ट्राफिक वार्डन दिपक बिर्हाडे याच्यासोबत वायरलेस कंपाऊंड चौकजवळ कर्तव्य बजावत होते. यावेळी ट्रिपल सिट बाईकवरुन जाणार्या राजू यादवसह त्याच्या दोन सहकार्यांना त्यांनी थांबविले. त्याला ट्रिपल सीटबाबत जाब विचारला असता राजूने त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. तुमचे काम फक्त फाईन मारणे आहे, फाईन मार आणि काय करायचे आहे ते कर अशी धमकी देत त्यांच्याा अंगावर येऊन त्यांच्या युनिफॉर्मवरील नेमप्लेट जोरात खेचली होती. दुसरीकडे त्याच्यासोबत असलेल्या सुमीत यादव आणि निरज यादव यांनीही त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करुन त्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. हा वाद इतका विकोपास गेला की या तिघांनी त्यांच्यावर हल्ला करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता.
ही माहिती प्राप्त होताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी तिघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांची नावे आणि राहण्याचा पत्ता नोंद करुन त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. तिन्ही आरोपी गोरेगाव येथील आरे कॉलनी, आदर्शनगरचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत परप्रांतियांकडून वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्याच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली असून या घटनेची वरिष्ठांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे कर्तव्य बजाविणार्या अशा आरोपीविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना देण्यात आले आहे.