अभिषेक घोसाळकर हत्याप्रकरणी मेहुल पारिखच्या अडचणीत वाढ
हत्येच्या कटाची पूर्वकल्पना असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज
राजू परुळेकर
मुंबई, – मुंबई महानगरपालिकेत दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले माजी नगरसेवक अभिषेक विनोद घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी मॉरीसभाई ऊर्फ मॉरीस नोरोन्हा याचा जवळचा मित्र मेहुल पारिख याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. पोलीस तपासात आलेल्या माहितीवरुन मेहुलने चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, त्याचा प्रत्यक्षात हत्येत सहभाग नसला तरी त्याला हत्येच्या कटाची पूर्वकल्पना होती असे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होण्याची शक्यता पोलीस सूत्राने वर्तविली आहे.
मॉरीस याचे बोरिवलीतील एमएचबी कॉलनीतील नॅन्सी कॉलनीत एक कार्यालय आहे. ८ फेब्रुवारीला त्याने माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना त्यांच्या कार्यालयात बोलाविले होते. तिथे त्यांच्यातील वाद संपुष्टात आल्याचा दावा करुन या दोघांनी फेसबुक लाईव्हद्वारे पुन्हा एकत्र काम करणार असल्याचे सांगितले होते. फेसबुक लाईव्ह सुरु असताना मॉरीसने अभिषेक यांची पाच गोळ्या झाडून हत्या केली आणि नंतर त्याच पिस्तूलमधून स्वतला गोळी घालून आत्महत्या केली होती. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून वरिष्ठांच्या आदेशावरुन गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. हा तपास हाती येताच पोलिसांनी मॉरीसचा अंगरक्षक अमेंद्रर अशोककुमार मिश्रा याला पोलिसांनी अटक केली होती. गुन्ह्यांत मॉरीसने वापरलेली पिस्तूल अमेंद्रर मिश्रा याची होती. या पिस्तूलचा त्याचा परवाना होता, मात्र उत्तरप्रदेशातून पिस्तूल आणल्यानंतर त्याने ती माहिती मुंबई पोलिसांना बंधनकारक होते, ती माहिती त्याने पोलिसांना दिली नव्हती. त्यात अमेंद्ररने हलगर्जीपणा केल्यामुळे ही घटना घडल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.
पोलीस कोठडीनंतर तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. याच गुन्ह्यांत मॉरीसचा जवळचा सहकारी मेहुल पारीख याच्यासह इतर काहींची पोलिसांनी चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली होती. मेहुलच्या चौकशीदरम्यान त्याने तो घटनेच्या वेळेस तिथे उपस्थित नव्हता. तो त्याच्या आजारी आईला बघण्यासाठी काही मिनिटांपूर्वीच रिक्षातून निघून गेल्याचे सांगितले. मात्र घटनास्थळाहून ताब्यात घेतलेल्या सीसीटिव्ही फुटेजवरुन मेहुल हा तिथे उपस्थित असल्याचे काही पुरावे पोलिसांना सापडले होते. मेहुलने त्याच्या जबानीत अनेक विसंगत माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे आतापर्यंतच्या चौकशीतून उघड झाले आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरीसचा राग होता. त्याला त्यांची हत्या करायची होती, याबाबत मॉरीसने अनेकदा मेहुलला सांगितले होते. हत्येच्या दिवशी मॉरीसची वागणुक संशयास्पद होती. त्याच दिवशी तो काहीतरी करणार याची मेहुलची माहिती होती. मात्र त्याने त्याला समजविण्याचा किंवा ही हत्या रोखण्याचा प्रयत्न केला नाही.
मॉरीसच्या कृत्याला त्याचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता का याबाबत पोलिसांना संशय आहे. अभिषेक घोसाळकर यांची हत्या आणि मॉरीसच्या आत्महत्येनंतर मेहुल पारीखने अचानक तेथून पलायन करण्यामागे नक्की काय कारण होते. मॉरीस कार्यालयात बोलावून त्याच दिवशी अभिषेक घोसाळकर यांची हत्या करणार होता याचा अंदाज आला होता का असे अनेक प्रश्नांना त्याने बगल देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याचा या संपूर्ण कटात प्रत्यक्ष सहभाग नसला तरी या कटाची संपूर्ण माहिती होती असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे मेहुल पारिखला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अटकेनंतर त्याची पुन्हा नव्याने चौकशी होणार आहे. या चौकशीनंतरच या हत्येमागील कारणाचा अधिकृत खुलासा होईल असे पोलिसांना वाटत आहे. याबाबत गुन्हे शाखेच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काहीही माहिती देण्यास नकार दिला. आमचा तपास सुरु असून तपासादरम्यान येणार्या प्रत्येक माहितीची शहानिशा सुरु आहे असे सांगितले.