वेगवेगळ्या अपघातात वयोवृद्ध महिलेसह तिघांचा मृत्यू
दोनजण जखमी; अपघाताच्या तीन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ जून २०२४
मुंबई, – दोन दिवसांत तीन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत एका वयोवृद्ध महिलेसह तिघांचा मृत्यू झाला तर दोन पादचारी जखमी झाले. जखमींना प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले. मृत वयोवृद्ध महिलेची ओळख पटली नसून तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. दरम्यान अपघातप्रकरणी कांदिवली, मानखुर्द आणि मालवणी पोलिसांनी तीन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.
पहिला अपघात शुक्रवारी सकाळी पावणेअकरा वाजता कांदिवलीतील पोयसर गांवदेवी रस्त्याने एस. व्ही रोडकडे जाणार्या माय फेअर ग्रीन सोसायटीजवळ झाला. राजेंद्र गुप्ता हा कांदिवली परिसरात राहत असून तो ओला कंपनीत चालक म्हणून कामाला आहे. याच परिसरात राहणारा सुरेंद्र हा त्याचा मित्र आहे. शुक्रवारी सकाळी त्याने राजेंद्रकडे कार चालविण्याची विनंती केली होती. त्यामुळे तो त्याला कार चालविण्याचे प्रशिक्षण देत होता. यावेळी सुरेंद्र हा कार चालवत होता तर राजेंद्र हा त्याच्या बाजूला बसून त्याला मार्गदर्शन करत होता. सुरेंद्रकडे कार चालविण्याचा परवाना नव्हता. तरीही तो कार चालविण्याचा प्रयत्न करत होता. ही कार सकाळी पावणेअकरा वाजता माय फेअर ग्रीन सोसायटीजवळ येताच सुरेंद्रने ब्रेकऐवजी जोरात एक्सलेटर दाबला. त्यामुळे कार जोरात पुढे गेली आणि कारने रस्त्यावरुन जाणार्या एका महिलेसह तिघांना धडक दिली. या अपघातात ते तिघेही जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या तिघांनाही पोलिसांनी कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे वयोवृद्ध महिलेला मृत घोषित करण्यात आले तर इतर दोघांना प्राथमिक औषधोपचारानंतर सोडून देण्यात आले. याप्रकरणी प्रवासकुामर महेश्वर बरल या जखमी पादचार्याच्या तक्रारीवरुन कांदिवली पोलिसांनी सुरेंद्र रमेश गुप्ता आणि राजेंद्र चिरकुड गुप्ता अशा दोघांविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून एका वयोवृद्ध महिलेच्या मृत्यूस तर दोघांना दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. रात्री उशिरा या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.
दुसरा अपघात गुरुवारी २० जूना सायंकाळी साडेचार वाजता मानखुर्द येथील मुंबई-वाशी हायवे, वाशी चेकपोस्टच्या टाटा हाऊसच्या मागील बाजूस झाला. मृत लक्ष्मणकुमार युगल यादव (२२) हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून सध्या तो विलेपार्ले येथील भाजीवाडी, शास्त्रीनगर परिसरात राहत होता. लक्ष्मणकुमार आणि त्याचा मोठा भाऊ अजयकुमार यादव हे दोघेही रिक्षाचालक आहेत. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता लक्ष्मणकुमार हा रिक्षा घेऊन वाशी चेकपोस्टच्या दिशेने जात होता. यावेळी मागून येणार्या एका ट्रकने त्याच्या रिक्षाला धडक दिली होती. या अपघातात लक्ष्मणकुमारचा जागीच मृत्यू झाला होता. तपासात हा ट्रक विष्णू माने हा चालक होता. ट्रकमध्ये त्याच्यासोबत अन्य एक चालक प्रकाश अल्दर आणि क्लिनर आनंदा असे तिघेही होते. अपघातानंतर विष्णू आणि प्रकाश हे दोघेही पळून गेले होते. आनंदाने घडलेला प्रकार मानखुर्द पोलिसांना सांगितला. त्यानंतर अजयकुमारच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विष्णू मानेविरुद्ध गुन्हा दाखल केला. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. विष्णू हा सातारा येथील कराडचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तिसर्या अपघातात वसीम अन्सार अहमद अन्सारी या प्लंबरचा मृत्यू झाला. वसीम हा त्याच्या पत्नी आणि मुलासोबत मालवणीत परिसरात राहत होता. प्लंबरचे काम करणारा वसीम बुधवारी त्याच्या कामासाठी बाहेर गेला होता. रात्री आठ वाजता काम संपल्यानंतर तो त्याच्या घराच्या दिशेने जात होता. यावेळी भरवेगात जाणार्या एका रिक्षाच्या धडकेने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला कांदिवलीच्या शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर रिक्षाचालक पळून गेला असून त्याच्याविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या रिक्षाचालकाचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.