फेसबुक मॅसेजर आयडी क्लोन करुन अभिनेत्रीची बदनामी

सोशल मिडीयावर बदनामी करणार्‍या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२५ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – उसने घेतलेल्या पैशांचा अपहार केलेल्या मित्राची सोशल मिडीयावर चिटरसह फ्रॉड म्हणून स्टोरी अपलोड केली म्हणून एका ३० वर्षांच्या अभिनेत्रीचा फेसबुक मॅनेजर आयडी क्लोन करुन तिच्याच मित्राने बदनामी करुन धमकी दिल्याचा प्रकार जोगेश्‍वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीनिवास या आरोपी मित्राविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

३० वर्षांची तक्रारार तरुणी जोगेश्‍वरीतील पाटीलपूत्र परिसरात राहते. ती फिल्म इंडस्ट्रिजमध्ये अभिनय करत असून त्यातून मिळणार्‍या उत्नानातून तिचा उदरनिर्वाह चालतो. २०१८ रोजी तिची श्रीनिवासशी ओळख झाली होती. यावेळी त्याने तिला तो एका चित्रपटाची निर्मिती करत असून त्याला काही कलाकरांची गरज आहे असे सांगितले. त्यामुळे तिने तिच्या परिचित काही कलाकरांशी त्याच्याशी ओळख करुन दिली होती. याच कामासाठी त्यांची दोन ते तीन वेळा भेट झाली होती. या भेटीदरम्यान तिने त्याच्याशी चित्रपटाविषयी चर्चा केली होती. मात्र चित्रपटावर अद्याप काम पूर्ण न झाल्याने शूटींगला सुरुवात झाली नसल्याचे तो तिला सांगत होता. याच दरम्यान तो चेन्नईला निघून गेला होता. मात्र ते दोघेही व्हॉटअपसह मोबाईलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. मे २०२३ मुंबईत आल्यानंतर ती त्याच्याासोबत आयपीएलची मॅच पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर गेली होती.

जून २०२३ तिने त्याला पैशांची गरज असल्याने साडेअकरा हजार रुपये दिले होते. मात्र ही रक्कम त्याने तिला परत केली नाही. पैशांची मागणी केल्यानंतर तो त्याची आई आजारी असून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असल्याचे कारण सांगत होता. नंतर त्याने तिचे फोन घेणे बंद केले होते. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी त्याने तिला कॉल केला होता, मात्र तिने त्याचा कॉल घेतला नाही. पैसे घेऊन त्याने तिची फसवणुक केली होती. त्यामुळे तिने फेसबुकवर श्रीनिवासविरुद्ध चिटर आणि फ्रॉड असा मॅसेज टाईप करुन एक स्टोरी अपलोड केली होती. ही स्टोरी त्याच्या निदर्शनास येताच त्याने तिचे व्हिडीओ आणि फोटो सेक्स वेबसाईटवर व्हायरल करुन तिची बदनामी करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर तिला देश-विदेशातून विविध मोबाईल क्रमांकावर अज्ञात व्यक्तीचे कॉल येऊ लागले. मात्र अनोळखी मोबाईल क्रमांक असल्याने तिने कोणाचेही कॉल घेतले नव्हते.

एका व्यक्तीचा तिला सतत कॉल येत असल्याने तिने त्याचा कॉल घेतला होता. यावेळी त्याने तिला तिचा मोबाईल क्रमांक श्रीनिवासने सोशल मिडीयावर अपलोड केल्याचे सांगितले. त्याचे त्याने तिला स्क्रिनशॉट पाठविले होते. ते स्क्रिनशॉट पाहिल्यानंतर तिला तिच्या बोगस फेसबुक आयडीवरुन श्रीनिवासने अनेकांना मॅसेज पाठविल्याचे दिसून आले. त्यामुळे तिला देश-विदेशातून अनेक तरुणांचे कॉल येत होते. तिने फेसबुकची ती लिंक ओपन केल्यानंतर तिला अडीच मिलियन फॉलोअर्स असल्याचे दिसून आले. श्रीनिवासने तिची बदनामी करण्याच्या उद्देशाने तिचे फेसबुक मॅसेजर आयडी क्लोन करुन त्यावरुन अनेकांना तिचा मोबाईल क्रमांक शेअर करुन तिला कॉल करण्यास प्रवृत्त केले होते.

अशा प्रकारे त्याने तिची सोशल मिडीयावर बदनामी करुन तिला तिचे अश्‍लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. हा प्रकार निदर्शनास येताच तिने ओशिवरा पोलिसांना ही माहिती सांगून श्रीनिवासविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी श्रीनिवासविरुद्ध बदनामीसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. त्याच्या मोबाईल क्रमकांवरुन त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page