15.66 कोटीच्या कोकेन तस्करीप्रकरणी विदेशी प्रवाशांना अटक
महसूल गुप्तवार्ता संचालनालय-सीमा शुल्क विभागाची कारवाई
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 फेब्रुवारी 2025
मुंबई, – पोटातून कोकेन तस्करीच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात दोन विदेशी नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तवार्ता संचालनालय आणि सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. या दोन्ही कारवाईत दोन्ही प्रवाशांच्या पोटातून या अधिकार्यांनी 94 कॅप्सूलमध्ये लपवून आणलेला 1 किलो 566 ग्रॅम वजनाचा उच्च प्रतीचे कोकेनचा साठा जप्त केला आहे. दोन्ही प्रवाशांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विदेशात गोल्ड आणि ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्याने अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध डीआरआय कस्टम अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे विदेशात येणार्या प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली जात होती. गेल्या आठवड्यात काँगो देशाचा एक प्रवासी किन्शासा येथून मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याने पोटातून ड्रग्ज आणल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. लोकल कोर्टाच्या आदेशानंतर त्याला जे. जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्या पोटातून डॉक्टरांनी दहा कॅप्सूल बाहेर काढले. या कॅप्सूलमध्ये 544 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले. त्याची किंमत 5 कोटी 44 लाख रुपये इतकी आहे.
ही कारवाई सुरु असताना रविवारी युगांडाच्या एन्टेबेहून आलेल्या एका विदेशी नागरिकाला कस्टम अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याने पोटातून कोकेन आणल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यालाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या दोन दिवसांत त्याच्या पोटातून या अधिकार्यांनी 84 कॅप्सूल जप्त केले. त्यात त्याने 1 किलो 22 ग्रॅम वजनाचे कोकेन आणले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत 1 कोटी 22 लाख रुपये इतकी आहे. या दोन्ही कारवाईत या अधिकार्यांनी 1 किलो 566 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले असून त्याची किंमत 15 कोटी 66 लाख आहे. दोन्ही प्रवाशांकडून कोकेन जप्त केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.