मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
8 एप्रिल 2025
मुंबई, – विदेशातून आणलेल्या गोल्डसह गांजा तस्करीचा सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका प्रवाशाला या अधिकार्यांनी अटक केली. या कारवाईत या अधिकार्यांनी 9 कोटी 53 लाखांचा हायड्रोपॉनिक गांजा आणि 58 लाखांचे गोल्ड असा दहा कोटी अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध गोल्ड तस्करीसह एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
विदेशात मोठ्या प्रमाणात गोल्ड आणि ड्रग्ज तस्करी होत असल्याने अशा तस्कराविरुद्ध हवाई गुप्तचर विभागासह सीमा शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना बँकाँक आणि दुबईहून काही प्रवाशी ड्रग्जसहीत गोल्ड तस्करी करणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीनतंतर या अधिकार्यांनी दुबई आणि बँकाँकहून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशासह त्यांच्या सामानाची तपासणी सुरु केली होती.
याच दरम्यान एका खाजगी विमानाने बँकाँकहून आलेल्या एका प्रवाशाला या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्यांना 9 किलो 532 ग्रॅम वजनाचे हायड्रोपॉनिक गांजाचा साठा सापडला. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे साडेनऊ कोटी रुपये इतकी आहेत. हा गांजा जप्त करुन या प्रवाशाला नंतर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
दुसर्या कारवाईत या अधिकार्यांनी दोन प्रवाशांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ते दोघेही दुबई येथून आले होते. त्यांच्या सामानात 0.789 किलो वजनाचे सोने सापडले. त्याची किंमत सुमारे 58 लाख 83 हजार रुपये इतकी आहे. या दोघांनी अंतर्वस्त्रातून सोने आणल्याचे उघडकीस आले. त्यांच्याविरुद्ध गोल्ड तस्करीप्रकरणी कारवाई करण्यात आली होती.