गोल्ड, ड्रग्ज व विदेशी चलनासह सात प्रवाशांना अटक
आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ जुलै २०२४
मुंबई, – विदेशातून आणलेल्या गोल्ड आणि ड्रग्ज तसेच विदेशात चोरटया मार्गाने विदेशी चलन घेऊन जाणार्या विविध कारवाईत सात प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. या सातही प्रवाशांकडून कोट्यवधी रुपयांचे गोल्ड, ड्रग्ज आणि विदेशी चलन या अधिकार्यांनी जप्त केले असून अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.
विदेशातून मोठ्या प्रमाणात गोल्ड आणि ड्रग्ज तस्करीविरोधात सीमा शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे विदेशातून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची संबंधित अधिकार्यांकडून तपासणी केली जाते. १५ जुलै ते २७ जुलै या कालावधीत या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेत चार विदेशी नागरिकासह बावीस प्रवाशांना वेगवेगळ्या कारवाईत अटक केली होती. त्यात एका श्रीलंकेतील नागरिकाचा समावेश होता. या कारवाईत या अधिकार्यांनी तेरा कोटी अकरा लाख रुपयांचे गोल्ड, ४ कोटी ९८ लाखांचे गांजा तर दोन प्रवाशांकडून ९६ लाख रुपयांचे विदेशी चलन हस्तगत केले आहेत. अलीकडेच दिल्लीतील वसंत विहारचा रहिवाशी असलेल्या एका प्रवाशाला ताब्यात घेतले होते. त्याने १४ हून व्हॅक्यूम पॅकेटमधून गांजा आणला होता. ते पॅकेट त्याने तीन लहान पुठ्ठ्यात लपविले होते. तपासणीदरम्यान ४९७७ ग्रॅम वजनाच्या गांजा या अधिकार्यांनी ताब्यात घेतला. त्याची किंमत सुमारे पाच कोटी रुपये इतकी आहे. त्यानंतर दुबई, जेद्दाह, शारजा येथून आलेल्या चार प्रवाशांना गोल्ड तस्करीच्या गुन्ह्यांत सीमा शुल्क विभागाने अटक केली. या चारही प्रवाशांकडून या अधिकार्यांनी सात किलो एकशे साठ ग्रॅम वजनाचे गोल्ड जप्त केले आहेत. ते गोल्ड त्यांनी एलईडी ड्राव्हर्सच्या प्लास्टिक केसेससह शरीरात लपवून आणले होते.
अन्य दोन कारवाईत या अधिकार्यांनी अहमदाबाद आणि कोलकाताचे रहिवाशी असलेल्या दोन प्रवाशांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या बॅगेत या अधिकार्यांना ९६ लाख रुपयांचे विदेशी चलन सापडले. विदेशी चलन घेऊन ते दुबईसह शारजाला जाणार होते. मात्र त्यापूर्वीच या दोघांना या अधिकार्यांनी अटक केली होती. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. आगामी काळातही ही कारवाई अशीच राहणार असल्याचे सांगण्यात आले.