काळ्या जादूने त्रस्त प्रवाशाने उडविली विमानतळावर खळबळ

श्रीनगरला विमान जाणार नाही, कोणीही वाचणार नाही

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – मुंबईहून श्रीनगरला विमान जाणार नाही, कोणीही प्रवाशी वाचणार नाही असे खळबळजनक विधान करुन एका प्रवाशाने रविवारी सकाळी डोमेस्टिक विमानतळावर एकच खळबळ उडवून दिली. मोहम्मद युसूफ अब्दुल्लाह मलिक असे या प्रवाशाचे नाव असून तो जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर, हजुरीबागचा रहिवाशी आहे. काळ्या जादूने तो मानसिक नैराश्यात असून त्यातून त्याने संबंधित विधान केले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान मोहम्मद युसूफ याच्याविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. त्याची माहिती त्याच्या कुटुंबियांसह नातेवाईकांना देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

नवी मुंबईतील खारघरचे रहिवाशी असलेले मणिशंकर शत्रुघ्नराय हे सीआयएसएफमध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. सध्या त्यांची नियुक्ती छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे. रविवारी सकाळी आठ वाजता ते कामावर हजर झाले होते. यावेळी त्यांना विलेपार्ले येथील डोमेस्टिक एअरपोर्ट येथे कर्तव्य देण्यात आले होते. सकाळी दहा वाजता मुंबईहून श्रीनगरला अकासा एअरलाईन्सचे विमान जाणार होते. त्यामुळे ते सर्व प्रवाशांची तपासणी करुन त्यांना आतमध्ये सोडत होते. याच दरम्यान तिथे मोहम्मद युसूफ आला आणि त्याने त्यांच्या कानात उर्दु भाषेत काहीतरी संभाषण केले होते. मात्र त्यांना तो काय बोलत आहे हे समजले नाही. त्यामुळे त्यांनी त्याला नक्कीच काय बोलायाचे आहे असे विचारणा केली होती. यावेळी त्याने मुंबई-श्रीनगर विमान जाणार नाही, या विमानातील कोणीही प्रवाशी वाचणार नाही असे सांगितले. त्यानंतर मोहम्मद युसूफ हा जवळच्या बोर्डिंग गेट क्रमांक २७ जवळील बँचवर जाऊन बसला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना ही माहिती दिली होती. त्यानंतर सीआयएसएफचे अधिकारी तिथे आले होते. मोहम्मद युसूफला ताब्यात घेतल्यानंतर तो मानसिक नैराश्यात होता. त्यातून त्याने संबंधित विधान केल्याचे उघडकीस आले.

चौकशीदरम्यान त्याचे नाव मोहम्मद युसूफ अब्दुल्लाह मलिक (५२) असून तो श्रीनगरचा रहिवाशी होता. त्याच्याकडील सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडले नाही. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात त्याचा बीपी वाढलेला होता, तो मानसिक नैराश्यात असल्याने अशा प्रकारे बडबड करत असल्याचे दिसून आले. ही माहिती नंतर विमानतळ पोलिसांना देण्यात आली. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याविरुद्ध विमानातील प्रवाशांच्या जिवीतास तसेच व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात आणणारी कृती करुन सार्वजनिक शांततेस धोका निर्माण केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दुपारी बारा वाजता विमानाचे सिक्युरिटी चेकींग करुन मुंबईहून श्रीनगरला जाणारे अकासा एअरलाईन्सचे विमान सोडण्यात आले होते. मोहम्मद युनूफ याच्यावर कोणीतरी काळी जादू केली असून त्यामुळे तो मानसिक नैराश्यात असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ही माहिती त्याची श्रीनगरमधील कुटुंबियांसह नातेवाईकाना कळविण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page