मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ जुलै २०२४
मुंबई, – बार ऍण्ड रेस्ट्रॉरंटमधील हुक्का तपासणीला विरोध करुन सरकारी कामात आणून पोलीस शिपायाला बारच्या मॅनेजरने कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना अंधेरी परिसरात घडली. याप्रकरणी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच जॉएल नॉरबट फर्नाडिस या आरोपी मॅनेजरला आंबोली पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना रविवारी रात्री अकरा वाजता अंधेरीतील विरा देसाई रोड, लिटील डोअर हॉटेल ऍण्ड बारमध्ये घडली. समाधान बापूराव पाटील हे कल्याणच्या मलंग रोड, नांदीवली परिसरात राहत असून आंबोली पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री उशिरा अकरा वाजता आंबोली पोलिसांचे एक विशेष पथक लिटील डोअर हॉटेल ऍण्ड बारमध्ये गेले होते. यावेळी तिथे हुक्का पार्लर सुरु आहे का याची पोलिसांकडून तपासणी सुरु होती. ही कारवाई करण्यास बारचा मॅनेजर जॉएल फर्नाडिस याने विरोध करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता. काही वेळानंतर त्याने पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की करुन पोलीस शिपाई समाधान पाटील यांच्या कानशिलात लगावली. या प्रकारानंतर तिथे उपस्थित पोलिसांनी जॉएलला चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी समाधान पाटील यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी जॉएलविरुद्ध ३५३, ३२३, ५०४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच रात्री उशिरा त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर सोमवारी दुपारी त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. कारवाईदरम्यान पोलिसांशी हुज्जत घालून, शिवीगाळ करुन धक्काबुक्की करणे तसेच ऑन ड्युटी पोलीस शिपायाला कानशिलात लगावणे जॉएल फर्नाडिस याला चांगलेच महागात पडले आहे.