मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ मार्च २०२४
मुंबई, – मुंबईतील वायव्य लोकसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर करताच कथित खिचडी घोटाळ्यात अमोल किर्तीकर यांना ईडीने बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले होते. मात्र अमोल किर्तीकर यांनी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीकडे वेळ मागितला आहे. त्यामुळे आगामाी दिवसांत कधीही त्यांची चौकशी होऊ शकते. लोेकसभेची उमेदवारी जाहीर होताच ईडीकडून चौकशीसाठी समन्स आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे समन्स पाठवून ईडी पुन्हा ऍक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे.
कोरोना काळात वितरण करण्यात आलेल्या कथित खिचडी घोटाळ्यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे विश्वासू सुजीत पाटकर, अमोल किर्तीकर, सुनिल ऊर्फ बाळा कदम, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळुंखे, फोर्सवन मल्टी सर्व्हिसेसचे भागीदार, कर्मचारी, स्नेहा कॅटरर्स, माजी सहाय्यक आयुक्तासह इतर पालिका अधिकारी आणि खाजगी व्यक्तींचा समावेश होता. एकूण ५२ विविध कंपन्यांना देण्यात आलेल्या कंत्राटातून चार महिन्यांत चार कोटीचे खिचडीचे वाटप करण्यात आले होते. त्यात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे गुन्हा दाखल होताच आर्थिक गुन्हे शाखेने तपासात सुरुवात केली होती. याच गुन्ह्यांत अमोल किर्तीकर आणि सुरज चव्हाण यांचा सहभागाचे काही पुरावे समोर आले होते. त्यामुळे ऑक्टोंबर २०२३ रोजी या दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. याच प्रकरणात सप्टेंबर २०२३ रोजी अमोल किर्तीकर यांची जबानी नोंदविण्यात आली होती. या संपूर्ण घोटाळ्यात अमोल किर्तीकर यांना सुमारे ५२ लाख रुपये तर सुरज चव्हाण यांना स्थलांतरीत कामगारांना खिचडी वाटपाचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीकडून ३७ लाख रुपये मिळाले होते. या कंपनीला नागरी कंत्राट देण्यासाठी त्यांना ही रक्कम देण्यात आल्याचा पोलिसांचा संशय होता. या संपूर्ण प्रकरणात मनी लॉड्रिंग झाल्याचा आरोप झाल्यानंतर त्याचा स्वतंत्र तपास ईडीने सुरु केला होता.
याप्रकरणी गुन्हा दाखल होताच ईडीने मनपा उपायुक्त हसनाळे यांच्यासह ठाकरे गटाचे सचिव आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण, इतर पाच खाजगी कंत्राटदाराच्या घरासह कार्यालयात छापा टाकला होता. सुरज चव्हाण यांना अटक करुन त्यांची ८८ लाख ५१ हजाराची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली होती. याच प्रकरणात अलीकडेच अमोल किर्तीकर यांना चौकशीसाठी बुधवारी २७ मार्चला हजर राहण्याचे समन्स ईडीने बजावले होते. मात्र अमोल किर्तीकर चौकशीसाठी हजर राहिले नाही. पूर्वनियोजित कार्यकमांसह चौकशीला हजर राहण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे कारण सांगून त्यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितली आहे. त्यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी ही विनंती केली होती. या विनंती अर्जावर आता ईडी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे अमोल किर्तीकर यांना बुधवारीच वायव्य मुंबईची लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यात त्यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठविल्याने आश्यर्च व्यक्त होत आहे.