मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका ट्रकच्या धडकेने दिनानाथ मंगरु गुप्ता या 74 वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाला. याप्रकरणी डी. एन नगर पोलिसांनी ट्रकचालक रमेश दिनय्याअप्पा स्वामी याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने ट्रक चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नंतर रमेश स्वामीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
हा अपघात सोमवारी दुपारी बारा वाजता अंधेरीतील एस. व्ही रोड, अंधेरी सबवे, मिलेनियम हॅरीटेज इमारतीसमोर झाला. अनिता जयप्रकाश गुप्ता ही महिला अंधेरी परिसरात राहत असून ती मजुरीचे तर तिचे पती रिक्षाचालक म्हणून काम करतात. तिच्याच शेजारी तिचे आई-वडिल असून तिचा भाऊ विनोद गुप्ता हा त्यांच्या गावी राहतो. तिचे वडिल दिनानाथ यांचा चिक्की विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजता ते नेहमीप्रमाणे सामान खरेदीसाठी अंधेरीला गेले होते.
दुपारी बारा वाजता ते मिलेलियम हॅॅरीटेज इमारतीसमोरुन जात होते. यावेळी अंधेरी रेल्वे स्थानकाकडून जोगेश्वरीकडे जाणार्या वाहिनीच्या दिशेने जाणार्या एका ट्रकने त्यांना धडक दिली होती. त्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच डी. एन नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या दिनानाथला पोलिसांनी तातडीने जवळच्या कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
ही माहिती नंतर त्यांची मुलगी अनिता गुप्ता हिला देण्यात आली होती. त्यामुळे ती कूपर हॉस्पिटलमध्ये गेली होती. तिथेच तिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ट्रकचालक रमेश दिनय्याअप्पा स्वामीविरुद्ध हलगर्जीपणाने ट्रक चालवून तिच्या वयोवृद्ध पित्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. स्वामी हा दादरानगर-हवेली, सिल्वासा, फलिया नरोलीचा रहिवाशी असून ट्रकचालक म्हणून काम करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.