मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ ऑगस्ट २०२४
मुंबई, – अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी पित्याला सहार पोलिसांनी अटक केली. ५३ वर्षांचा आरोपी हा पिडीत मुलीचा दत्तक पिता असून त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिडीत मुलगी ही अंधेरी येथे राहते. तिच्या आईच्या निधनानंतर तिला आरोपीने दत्तक घेतले होते. तेव्हापासून ती त्याच्यासोबत राहत होती. १५ जून ते २२ ऑगस्ट या कालावधीत ही मुलगी घरी एकटीच असताना तिचा पिता तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करत होता. त्याच्याकडून तिचा सतत मानसिक व शोषण सुरु होता. त्यामुळे ती त्याला अनेकदा विरोध करत होती. विरोध केल्यानंतर तो तिला हाताने आणि पट्ट्याने बेदम मारहाण करत होता. या शोषणाला कंटाळून तिने तिच्या वयोवृद्ध नातेवाईक महिलेला हा प्रकार सांगितला होता. तिने तिला सहार पोलीस ठाण्यात आणले आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी ७० वर्षांच्या वयोवृद्ध महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध विनयभंगासह मारहाण करणे आणि पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत आरोपी पित्याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते.