तृतीयपंथी प्रेयसीवर प्रियकराकडून तिक्ष्ण हत्याराने हल्ला
दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणून हल्ला केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – ऍण्टॉप हिल येथे राहणार्या एका ३६ वर्षांच्या तृतीयपंथीवर तिच्याच प्रियकराने तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात नूर ऊर्फ काजल जखमी झाली असून तिच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. हल्ल्यानंतर पळून गेलेल्या सुरज बाबू गजलू ऊर्फ सूर्या देवेंद्र या २८ वर्षांच्या आरोपी प्रियकराला ऍण्टॉप हिल पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना रविवारी रात्री उशिरा दोन वाजता सायन येथील फ्लॅक रोड, केरली गल्लीसमोर घडली. पूजा ही तृतीयपंथी असून ऍण्टॉप हिल येथे राहते. रविवारी पूजा ही तिचे सहकारी लालू, नूर ऊर्फ काजल यांच्यासोबत रेल्वे ब्रिजजवळील सार्वजनकि शौचालयाजवळ थांबले होते. यावेळी तिथे सुरज हा त्याच्या बाईकवरुन आला होता. यावेळी त्याने नूरकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र तिने त्याला दारु पिण्यासाठी पैसे देणार नाही असे सांगितले. याच कारणावरुन त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. रागाच्या भरात सुरजने नूरवर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात तिच्या गळ्याला, छातीला आणि चेहर्याला गंभीर दुखापत झाली होती. यावेळी नूरसोबत असलेल्या पूजा आणि लालू यांनी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. रागाच्या भरात त्याने त्यांनाही जिवे मारण्याची धमकी देत तेथून पळ काढला. रक्तबंबाळ झालेल्या नूरला इतर दोघांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. ही माहिती मिळताच ऍण्टॉप हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी पूजाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सूर्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या सुरजला काही तासांत पोलिसांनी अटक केली. प्राथमिक तपासात सुरज आणि नूर यांचे गेल्या दहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुरजला दारु पिण्याचे व्यसन होते, त्यामुळे तो तिच्याकडे सतत पैशांची मागणी करत होता. पैसे दिले नाहीतर तिच्याशी भांडण करुन तिला मारहाण करत होता. मात्र नूर त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. रविवारी दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून त्याने तिच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन तिला गंभीर दुखापत केली होती. अटकेनंतर सुरजला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.