विरारच्या ज्वेलरी कारखान्यांत दरोड्याची योजना फसली
मध्यप्रदेशातून आणलेल्या घातक शस्त्रांसह दुकलीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ मार्च २०२४
मुंबई, – विरार येथील एका ज्वेलरी कारखान्यातील कारागिरांना घातक शस्त्रांचा धाक दाखवून लुटमारीसाठी जाणार्या एका दुकलीस गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी दहिसर येथून अटक केली. दिलीप सुधीर मैती आणि रितेश राजाराम राठोड अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. या दोघांनी दरोड्यासाठी ते पिस्तूल पंधरा दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातून आणल्याचे तपासात उघडकीस आले आहे. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी त्यांच्यविरुद्ध कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिलीप मैती हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो त्याच्या एका सहकार्यासोबत एका गंभीर गुन्ह्यांच्या उद्देशाने दहिसर येथे येणार असल्याची माहिती युनिट अकराच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळील दहिसर चेकनाका, मिना हॉटेलजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती. बुधवारी सायंकाळी तिथे दोनजण आले होते. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटत होती. त्यामुळे त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि सात जिवंत काडतुसे सापडले. चौकशीदरम्यान दिलीप मैती हा कोलकाताचा तर रितेश राठोड हा मिरारोडचा रहिवाशी असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडे सापडलेल्या पिस्तूलविषयी चौकशी केल्यानंतर त्यांनी ते पिस्तूल पंधरा दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातून एका व्यक्तीकडून विकत घेतल्याचे सांगितले. विरार येथे ज्वेलरी कारखान्यात घातक शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार करण्याची त्यांची योजना होती. त्यासाठी संपूर्ण परिसराची रेकी केली होती. बुधवारी ते दोघेही दरोड्याच्या उद्देशाने विरार येथे जाणार होते, मात्र दहिसर येथे आल्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यामुळे त्यांचा ज्वेलरी कारखान्यात दरोड्याची योजना फसली गेली होती. या कबुलीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही गुरुवारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.