घातक शस्त्रांसह पाचजणांच्या टोळीला अटक
पाच पिस्तूल, गावठी कट्टा, जिवंत काडतुसे जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून त्याची विक्री करणार्या पाच वेगवेगळ्या कारवाईत पोलिसांनी पाचजणांच्या टोळीला अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी दोन देशी बनावटीचे पिस्तूल, दोन गावठी कट्टा, मॅगझीन आणि जिवंत काडतुसांचा साठा जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर पाचही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
पहिल्या कारवाईत साकिनाका पोलिसांनी संदीप राजेश शुक्ला याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले आहे. अंधेरी-कुर्ला रोडवरील आयबीपी पेट्रोल पंपाजवळील दर्शन उद्योग भवन परिसरात काहीजण घातक शस्त्रांसह येणार असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदारे, पोलीस हवालदार खैरमोडे, भुवन, पवार, गायकर, पोलीस शिपाई करांडे यांनी संदीपला घातक शस्त्रांसह अटक केली होती.
दुसर्या कारवाई कुर्ला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलीस शिपाई वावरे, जायकर, लहामगे, कुर्हाडे यांनी आफ्ताब आसिफ शेख याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. कुर्ला येथील एलबीएस मार्ग, इंदिरानगर, बोहरी कब्रस्तान परिसरात पोलीस गस्त घालत असताना या पथकाने आफ्ताबला ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना देशी कट्टा सापडला.
तिसर्या कारवाईत आरसीएफ पोलिसांनी सनी प्रभाकर जाधव या २४ वर्षांच्या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक मॅगझीन आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केले आहे. पूर्व दुतग्रती महामार्ग, जिजामाता नगर, पांचरपोळच्या दिशेने जाणार्या वाहिनीवर काहीजण घातक शस्त्रांसह यणेार असल्यासची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खान, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद खैरनार व अन्य पोलीस पथकाने सनीला घातक शस्त्रांसह अटक केली.
अन्य एका कारवाईत संजय महावीर राजेरिया याला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. संजय हा घातक शस्त्रे घेऊन गोरेगाव येथील लक्ष्मीनगर, रुमानिया हॉटेलजवळ घातक शस्त्रे घेऊन आला होता. ही माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ठाकरे यांच्या पथकातील गावठी कट्टा पोलीस उपनिरीक्षक पियुष टारे,पोलीस शिपाई आवळकर, आईर यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून संजयला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक गावठी कट्टा जप्त केला आहे.
पवई येथील पाचव्या कारवाईत महेश राजेश भोईर या २५ वर्षांच्या तरुणाला गावठी कटट्यासह पवई पोलिसांनी अटक केली. महेश अभिलेखावरील गुन्हेगार असून तो पवई परिसरात घातक शस्त्रे घेऊन आला होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कांबळे, पोलीस हवालदार झेंडे यांनी महेशला ताब्यात घेतले होते. या पाचही आरोपींविरुद्ध घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.