एटीएम कार्डची बदलून फसवणुक करणार्या टोळीचा पर्दाफाश
चौकडीला अटक; चौदा गुन्ह्यांची नोंद तर पाच गुन्ह्यांची उकल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ डिसेंबर २०२४
पालघर, – एटीएम कार्डची अदलाबदल करुन फसवणुक करणार्या एका टोळीचा पालघर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी चार रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या अटकेने पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. किस्मत बरकतअली शेख, हसमत बरकतअली शेख, दिपक बिपीन झा आणि हरेश राहुल प्रधान ऊर्फ दैत्या अशी या चौघांची नावे असून ते सर्वजण कल्याण व उल्हासनगरचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. एटीएमची अदलाबदल करुन फसवणुक करणारी ही एक सराईत टोळी असून या टोळीविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात चौदाहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भगवान नामदेव हातेकर हे ६७ वर्षांचे तक्रारदार वयोवृद्ध मजुरीचे काम करत असून ते सध्या पालघरच्या टेंभोडे परिसरात राहतात. २७ सप्टेंबरला ते जवळच्या एटीएम सेंटरमध्ये गेले होते. यावेळी तिथे तीन तरुण आले आणि त्यांनी त्यांना पैसे काढण्यास मदत करतो असे सांगून हातचलाखीने त्यांचे एटीएम कार्ड घेतले. त्यांना दुसरे कार्ड दिल्यानंतर त्यांनी दुसर्या एटीएम सेंटरमधून ५० हजार रुपये काढून त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पालघर पोलिसांना हा प्रकार सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. गेल्या काही दिवसांत पालघर परिसरात अशाच फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यामुळे त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पालघर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशांनतर पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय ठाकूर, रोहित खोत, पोलीस अंमलदार वैभव जामदार, भगवान आव्हाड, सागर राऊत, चंद्रकांत सुरुम, किशोर पाटील यांनी तपास सुरु केला होता. तपासादरम्यान या गुन्ह्यांतील आरोपी टिटवाळा येथील बनेलीचे रहिवाशी असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रोहित खोत यांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने बनेली परिसरातून किस्मत, हसमत, बिपीन आणि हरेश या चौघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांतील एक होडा सिटी कार आणि तीस हजार रुपयांची कॅश असा पाच लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तपासात ही टोळी एटीएम सेंटरमधून थांबून तिथे पैसे काढण्यासाठी येणार्या लोकांना बोलण्यात गुंतवून त्यांचे एटीएम पीन क्रमांक मिळवत होती. त्यानंतर त्यांच्या एटीएम कार्डची अदलाबदली करुन फसवणुक करत होती. चारही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्रातील विविध शहरात अनेक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्या अटकेने पालघर, कन्हान आणि मुंब्रा पोलीस ठाण्याच्या पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे तर त्यांच्याविरुद्ध नारपोली, महात्मा फुले चौक, डोबिवली, भिवंडी, शिवाजीनगर, ठाणेनगर, मुंब्रा, वालीव, कल्याण तालुका पोलीस ठाण्यात चौदाहून अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.