प्रेमसंबंधाच्या वादातून माजी प्रियकरासह दोघांवर हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत प्रियकरासह तिघांना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
15 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – प्रेमसंबंधाच्या वादातून माजी प्रियकरावर आजी प्रियकरासह त्याच्या दोन सहकार्यांनी तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सांताक्रुज परिसरात घडली. या हल्ल्यात माजी प्रियकर सचिन वर्मा व त्याचा मित्र सुरजकुमार ब्रिजशाम द्विवेदी असे दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याप्रकरणी सांताक्रुज पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी प्रियकरासह तिघांना अटक केली आहे. अब्दुल्ला तबरेज कुरेशी, अम्मार आजिम सय्यद आणि तोहिद वली खान अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना मंगळवारी 14 ऑक्टोंबरला रात्री पाऊणच्या सुमारास सांताकुज येथील लिंक रोडकडे जाणार्या रस्त्यावर झाला. सुरजकुमार हा मर्चंट नेव्हीमध्ये क्रु मॅनेजर म्हणून काम करतो. तो सध्या त्याच्या कुटुंबियांसोबत सांताक्रुजच्या गजधर बांध, फुलवाली चाळीत राहतो. सचिन हा त्याचा मित्र असून तोदेखील याच परिसरात राहतो. सचिनचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. सध्या या तरुणीचे अम्मार या तरुणाशी प्रेमसंबंध आहे. सचिन हा पूर्वीचा प्रियकर असल्याने त्यांच्यात जुना वाद होता. मंगळवारी रात्री उशिरा सचिन हा सुरजकुमारसोबत लिंक रोडच्या दिशेने जाणार्या रस्त्यावरुन जात होता.
यावेळी तिथे अम्मार हा त्याच्या दोन मित्रांसोबत आला होता. प्रेयसीवरुन सुरु असलेल्या वादातून अम्मारने त्याला जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्याला शिवीगाळ करुन या तिघांनी त्यांच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले. त्यात सचिनच्या छातीला आणि पोटाला तर सुरजकुमारच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर ते तिघेही तेथून पळून गेले होते. हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांनाही स्थानिक रहिवाशांनी तातडीने वांद्रे येथील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हॉस्पिटलमधून ही माहिती प्राप्त होताच सांताक्रुज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी सुरजकुमारची जबानी नोंदवून पोलिसांनी अम्मारसह इतर दोघांविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अब्दुल्ला कुरेशी, अम्मार सय्यद आणि तोहिद खान या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. चौकशीत प्रेमसंबंधातून हा हल्ला झाल्याचे उघडकीस आले. अटकेनंतर तिन्ही आरोपींना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
मनपा कर्मचार्यावर हल्ला करणार्या चौघांना अटक
पूर्ववैमस्नातून एका मनपा कर्मचार्यावर चारजणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात विनोद दिलीप तुपारे (41) हे जखमी झाले असून त्याच्यावर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून नेहरुनगर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. सिद्धार्थ नाथा खरात, सिद्धांत दिपक गायकवाड, अनिकेत दिपक गायकवाड आणि ऋतिक कांबळे अशी या चौघांची नावे असून याच गुन्ह्यांत ते चौघेही सध्या पोलीस कोठडीत आहे.
चुन्नाभट्टी येथे राहणारे विनोद तुपारे हे मनपामध्ये कामाला आहे. त्यांचे आरोपीशी जुना वाद होता. याच वादातून सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता चेंबूर येथील सर्व्हिस रोड, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, श्रमजीवी नपगर परिसरात विनोद यांच्यावर चारही आरोपींनी हल्ला केला होता. हॉकीस्टिक आणि बांबूने केलेल्या हल्ल्यात विनोद हे गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या तक्रारीनंतर नेहरुनगर पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली.