बॅग उघडून सोळा लाखांचे दागिने चोरीचा पर्दाफाश

चोरीच्या मुद्देमालासह रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ सप्टेंबर २०२४
मुंबई, – बॅग उघडून सुमारे सोळा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि कॅश असा मुद्देमालाच्या चोरीचा पर्दाफाश करण्यात आझाद मैदान पोलिसांना यश आले आहे. अब्बास मुस्तफा लब्बे असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीचे सर्व दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. अब्बास हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील यांनी सांगितले. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

तक्रारदार ज्वेलर्स व्यापारी असून ते कल्याण येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचे कल्याणच्या चिंचवाडा गावात एक ज्वेलर्स दुकान आहे. झव्हेरी बाजार येथे होलसेलमध्ये सोन्याचे दागिने खरेदी करुन ते दागिन्यांची विक्री करतात. २ सप्टैंबरला ते झव्हेरी बाजार येथे सोन्याचे दागिने खरेदीसाठी आले होते. विविध पंेंडल, माळ, चैन, मंगळसूत्र, टॉप्स आणि रिंग असे सोन्याचे दागिने खरेदी करुन झव्हेरी बाजार येथून पायी डी. एन रोड, अंजुमन इस्लाम शाळेजवळून जात होते. यावेळी त्यांची बॅग उघडून अज्ञात चोरट्यांनी बॅगेतील विविध सोन्याचे दागिने आणि कॅश असा १६ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आझाद मैदान पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.

या तक्रारीची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक दळवी यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस निरीक्षक प्रविण पावले, सहाय्यक पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील, आनंद शहाणे, पोलीस हवालदार राजेंद्र कटरे, संदीप मावळे, पोलीस शिपाई सचिन माने, ज्ञानेश्‍वर मुंढे, विजय वाडिले, अमरदीप किर्तकर, सतीश वाळे, सोमनाथ घुगे, मनोज गारे, दिपक पवार यांनी तपासाला सुरुवात केली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील, आनंद शहाणे व त्यांच्या पथकाने रे रोड परिसरातून अब्बास लब्बे याला शिताफीने ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. अब्बास हा रे रोड परिसरात राहत असून तो अधूनमधून तिथे येत होता. अटकेच्या भीतीने त्याने स्वतचे अस्तिस्व लपवून ठेवले होते. तरीही त्याची माहिती काढून त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे सर्व दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. हा गुन्हा त्याने त्याचा मित्र कालिया याच्या मदतीने केला होता. या गुन्ह्यांत कालियाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा शोध सुरु आहे. अब्बासविरुद्ध शिवडी, सीएसएमटी रेल्वे, मुंबई सेंट्रल रेल्वे, भोईवाडा पोलीस ठाण्यात पाचहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला रविवारी १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page