बाबा सिद्धीकी यांच्या मारेकर्यांना आर्थिक मदत करणारा गजाआड
पुण्यातून उत्तरप्रदेशात पळून गेलेल्या चौथ्या आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राष्ट्रवादीचे नेते झियाउद्दीन अब्दुल रहिम सिद्धीकी ऊर्फ बाबा सिद्धीकी यांच्या हत्येतील मारेकर्यांना आर्थिक मदतीसह लॉजिस्टिक मदत पुरविणार्या आरोपीस गजाआड करण्यात गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना यश आले आहे. हरिशकुमार बालकराम निशाद असे या २६ वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशच्या बहराईच, कैसरगंज, गंडाराचा रहिवाशी आहे. पुण्यातून उत्तरप्रदेशात पळून गेल्यानंतर काही दिवसांत त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टाने २१ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेने या गुन्ह्यांतील अटक आरोपींची संख्या आता तीन झाली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप आणि प्रविण रामेश्वर लोणकर या तिघांना पोलिसांनी अटक केली असून ते तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.
शनिवारी १२ ऑक्टोंबरल वांद्रे येथील निर्मलनगर, खेरनगर परिसरात बाबा सिद्धीकी यांची तीन अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर पळून जाणार्या तीनपैकी गुरमेल बलजीत सिंग आणि धर्मराज राधे कश्यप या दोघांनाही पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीनंतर पुण्यातून प्रविण लोणकर याला पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत ते तिघेही पोलीस कोठडीत असून त्यांच्या चौकशीत या गुन्ह्यांत शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा, मोहम्मद जिशान अख्तर, शुभम रामेश्वर लोणकर, हरिशकुमार निशाद यांचे नाव समोर आले होते. त्यांचा शोध सुरु असताना उत्तरप्रदेशात गेलेल्या पोलीस पथकाने हरिशकुमार निशादला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला मंगळवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला २१ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत पोलीस तपासात हरिशकुमारने या गुन्ह्यांत अटक व पाहिजे आरोपींना मदत केल्याचे उघडकीस आले आहे. गुन्ह्यांचा कट तडीस नेण्यासाठी त्याने आर्थिकसह लॉजिस्टिक मदत केली होती.
धर्मराज आणि हरिशकुमार हे दोघेही एकाच गावचे रहिवाशी असून एकमेकांच्या परिचित आहेत. त्याचा पुण्यात भंगाराचे दुकान होते. याच दुकानात धर्मराज आणि शिवकुमार गौतम यांना त्याने कामावर ठेवले होते. त्यानेच शुभमला मारेकर्यांना शस्त्रे पुरविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर बाबा सिद्धीकी यांच्या हत्येसाठी शुभमने मारेकर्यांना घातक शस्त्रे दिली होती. या शस्त्रांसह मारेकर्यांच्या राहण्याची, खाण्याची व्यवस्था त्यानेच दिलेल्या पैशांतून करण्यात आलीद होती. इतकेच नव्हे तर प्रविणने तिन्ही मारेकर्यांना तीन लाख रुपये आगाऊ दिले होते. ही रक्कमही हरिशकुमारने प्रविणच्या मार्फत मारेकर्यांना दिली होती. त्यामुळे या आर्थिक व्यवहाराच्या अप्पर आणि लोअर लिंकची आता पोलिसाकडून चौकशी सुरु आहे. हत्येच्या योजनेपासून कट तडीस नेण्यापर्यंतची सर्व माहिती त्याला आधीच माहिती होती. त्यामुळे त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. हरिशकुमारच्या पैशांच्या व्यवहाराबाबत त्याच्या बँकेसह ऑनलाईन व्यवहाराचीही पोलिसांनी चौकशी सुरु करण्यात आली आहे. किल्ला न्यायालयात हरिशकुमारच्या वतीने ऍड. अजय दुबे यांनी बाजू मांडली होती.