मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३ डिसेंबर २०२४
मुंबई, – माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी ऊर्फ झियाउद्दीन अब्दुल रहिम सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपीविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सव्वासपैकी आठ आरोपींना मोक्का कायद्यांतर्गत अटक केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी या आठही आरोपींना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले. या सर्व आरोपींची नव्याने चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीतून जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्यावर गुन्हे शाखेने भर दिला आहे. या गुन्ह्यांत मोस्ट वॉण्टेड गॅगस्ट अनमोल बिष्णोईसह शुभम रामेश्वर लोणकर आणि झिशान मोहम्मद अख्तर या तिघांना वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले आहे.
१२ ऑक्टोंबर वांद्रे येथे बाबा सिद्धीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याचा तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. हा तपास हाती येताच गोळीबारानंतर पळून जाणार्या गुरमेल बलजीत सिंग आणि धर्मराज राधे कश्यप या दोन्ही शूटरला पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी दोन पिस्तूल, एक मॅगझीन, २८ जिवंत काडतुसे जप्त केले होते. त्यांच्या चौकशीनंतर त्यांच्या इतर सहकार्यांची नावे समोर आली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने पुणे, पंजाब, उत्तरप्रदेशासह विविध ठिकाणी छापे इतर २४ आरोपींना अटक केली होती.
त्यापैकी प्रविण रामेश्वर लोणकरला १३ ऑक्टोंबर, हरिशकुमार बालकराम निशाद १५ ऑक्टोंबर, नितीन गौतम सप्रे, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी, संभाजी किसन पारधी, राम फुलचंद कनोजिया यांना १८ ऑक्टोंबर, भगवतसिंग ओमसिंगला २० ऑक्टोंबर, अमीत हिसमसिंग कुमार, रुपेश राजेंद्र मोहोळ करण राहुल साळवे, शिवम अरविंद कोहाड यांना २३ ऑक्टोंबर, सुजीत सुशील सिंगला २५ ऑक्टोंबर, गौरव विलास आपुणे ६ नोव्हेंबर, आदित्य राजू गुळणकर आणि रफिक नियाज शेख ७ नोव्हेंबर, शिवकुमार गौतम ऊर्फ शिवा बालकिशन गौतम, अनुराग राधेश्याम कश्यप, ज्ञानप्रकाश प्रदीपकुमार त्रिपाठी, आकाश बृजकुमार श्रीवास्तव आणि अखिलेंद्र प्रतापसिंह सुरेशसिंह या पाचजणांना ११ नोव्हेंबर, आकाशदिप कारजसिंग गिलला १६ नोव्हेंबर, सलमानभाई इक्बालभाई बोहराला १७ नोव्हेंबर तर सुमीत दिनकर वाघला २२ नोव्हेंबरला अटक झाली होती.
याच गुन्ह्यांत ते सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत होते. या आरोपींविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई पोलिसांनी सुरु केली होती. अखेर शनिवारी अटक केलेल्या २६ आरोपीविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत मंगळवारी तिन्ही शूटरसह आठजणांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना सायंकाळी मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने सर्वांना शनिवार ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.