बाबा सिद्धीकी हत्येप्रकरणी सहाजणांच्या कोठडीत वाढ

दोन शूटरसह प्रविण लोणकरला न्यायालयीन कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या सहा आरोपींपैकी हरिशकुमार बालकमराम निशाद याची २८ ऑक्टोंबरपर्यंत तर नितीन गौतम सप्रे, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी, संभाजी किसन पारधी, राम फुलचंद कनोजिया या पाचजणांची ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. इतर तीन आरोपी गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप आणि प्रविण रामेश्‍वर लोणकर यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या सर्व आरोपींना शनिवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते.

बाबा सिद्धीकी हत्येनंतर गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी आतापर्यंत चौदा आरोपींना अटक केली होती. ते सर्वजण सध्या पोलीस कोठडीत होते. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्या सर्वांना शनिवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप आणि प्रविण रामेश्‍वर लोणकर या तिघांना कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच हरिशकुमार बालकराम निशाद याची २८ ऑक्टोंबर तर नितीन गौतम सप्रे, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी, संभाजी किसन पारधी, राम फुलचंद कनोजिया या पाचजणांच्या पोलीस कोठडीत ४ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
सुजीत सिंगला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
याच गुन्ह्यांत शुक्रवारी सुजीत सुशील सिंग ऊर्फ बब्बू सिंग याला पंजाबच्या लुधियाना शहरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला शनिवारी पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यांत अटक झालेला तो पंधरावा आरोपी आहे. दुपारी मेडीकल केल्यानंतर त्याला इतर आरोपींसोबत न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला ४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सुजीत हा वॉण्टेड आरोपी मोहम्मद जिशान अख्तरचा खास सहकारी असून त्याला बाबा सिद्धीकी यांच्या हत्येची माहिती होती. त्यामुळे तो एक महिन्यांपूर्वीच मुंबईतून पंजाबला पळून गेला होता. सुजीत हा मूळचा उत्तरप्रदेशच्या लखनऊचा रहिवाशी आहे. तो घाटकोपर येथील छेडानगर परिसरात राहत होता. तिथे त्याची ओळख मोहम्मद जिशानची झाली होती. त्यानेच त्याची ओळख करुन या कटातील दोन आरोपी राम कनोजिया आणि नितीन सप्रे यांच्याशी करुन दिली होती. या दोघांसोबत त्याची दोन ते तीन वेळा भेट झाली होती. या भेटीदरम्यान त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page