बॅग लिफ्टिंगच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक
पाच गुन्ह्यांची उकल करुन साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१४ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – बॅग लिफ्टिंगच्या गुन्ह्यांतील एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला रेल्वे गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. शिवाजी विजय बागुल असे या २८ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने बॅग लिफ्टिंगच्या पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांतील सुमारे साडेचार लाखांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
बुधवारी १३ नोव्हेंबरला रे रोड परिसरात काहीजण चोरीच्या मोबाईलची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक व्ही. एन आढारी, पोलीस हवालदार विशाल वर्पे, मोहन धोंडे, अभिमन्यू जाधव, राजेंद्र गर्जे, प्रकाश कांबळे, रामजी पुजलवड, प्रसाद वाडकर, प्रथमेश गायकवाड, सौरभ चौधरी आणि सचिन शिंदे यांनी रे रोड स्थानकात साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी रेल्वे स्थानकात आलेल्या शिवाजी बागुल या संशयित तरुणाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडील सामानाची झडती घेतली असता त्याच्याकडे एक मोबाईल सापडला. तपासात हा मोबाईल चोरीचा होता, याबाबत वडाळा रेल्वे पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे त्याला वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान तो बॅग लिफ्टिंगच्या गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्या चौकशीतून वडाळा, वाशी, वांद्रे आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातील पाच बॅग लिफ्टिंगच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. त्याने पाचही गुन्ह्यांतील बॅगा माटुंगा रेल्वे स्थानकाजवळील पटरीलगत असलेल्या झाडीत लपवून ठेवल्या होत्या. या पाचही बॅगा नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्यांतील दोन मोबाईल, सोन्याचे एक मंगळसूत्र, दोन लॅपटॉप, एक टँब असा ४ लाख ५३ हजाराचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याच गुन्ह्यांत त्याचा ताबा नंतर वडाळा रेल्वे पोलिसांकडे सोपविण्यात आला होता.
अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. केवळ संशयावरुन शिवाजी बागुलला अटक करुन बॅग लिफ्टिंगच्या पाच गुन्ह्यांची उकल करुन साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करणार्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांच्यासह त्यांच्या पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.