ज्वेलर्स मालकाला फसविण्यासाठी दुकानात शस्त्रे ठेवली
घातक शस्त्रांसह कर्मचार्यासह शस्त्रे पुरविणार्याला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ डिसेंबर २०२४
मुंबई, – ज्वेलर्स मालकाला फसविण्यासाठी दुकानात शस्त्रे ठेवल्याप्रकरणी एका कर्मचार्यासह शस्त्रे पुरविणार्या आरोपीला वांद्रे युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. निरंजन सुदर्शन गुप्ता आणि केतन मनिष पारिख अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन, नऊ जिवंत काडतुसे, तीन मोबाईल जप्त केले आहेत. घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत आरोपींना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील केतन हा एका ज्वेलर्स व्यापार्याकडे कामाला असून त्यानेच त्याच्या मालकाला खोट्या गुन्ह्यांत अडकाविण्यासाठी ते शस्त्रे ज्वेलर्स दुकानात ठेवल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
केतन पारीख हा भाईंदर परिसरात राहत असून तो चिराबाजार येथील एका वयोवृद्ध ज्वेलर्स दुकानात कामाला आहे. त्याने त्याच्या मालकाला फसविण्याच्या उद्देशाने त्याच्या दुकानात घातक शस्त्रे लपवून ठेवल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक, पोलीस हवालदार भिकाजी खडपकर, नानासाहेब शेळके, विनय चौगुले, पोलीस शिपाई अमोल सोनावणे, पोलीस हवालदार चालक शशिकांत निकम यांनी चिराबाजार परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. काही वेळाने या पथकाने किरणराज मुन्नालालजी शहा या ६७ वर्षांच्या ज्वेलर्स व्यापार्याच्या शॉपमध्ये छापा टाकला होता.
या कारवाईत पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि नऊ जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. याच गुन्ह्यांत नंतर निरंजन गुप्ता आणि केतन पारीख या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. तपासात ते शस्त्रे केतनला निरंजनने दिले होते. केतनला त्याचे मालक किरणराज शहा यांना खोट्या गुन्ह्यांत अडकावयाचे होते. त्यामुळे त्याने निरंजनकडून घातक शस्त्रे घेऊन ते शस्त्रे त्याच्या मालकाच्या दुकानात लपवून ठेवले होते. तपासात ही माहिती उघडकीस येताच त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींना अटक केली.
अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. निरंजनने ते घातक शस्त्रे कोठून आणले, ते शस्त्रे कोणी दिले. केतनला स्वतच्या मालकाला खोट्या गुन्ह्यांत अडकावयाचे होते, त्यामागील कारण काय याचा आता पोलीस तपास करत आहेत.