१९ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकाला अटक
जे. जे. मार्ग परिसरात नवी मुंबई एटीएसची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ जून २०२४
मुंबई, – बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून बेनापोल सीमेवरुन भारतात आलेल्या सिराज मंसुरअली शेख ऊर्फ सिराजउल्ला मंसुरअली इस्लाम या ३४ वर्षांच्या बांगलादेशी नागरिकाला नवी मुंबईच्या एटीएसने जे. जे मार्ग परिसरातून अटक केली. सिराज हा एका टुल्स ऍण्ड हार्डवेअर दुकानात सेल्समन म्हणून काम करत असून तो गेल्या १९ वर्षांपासून मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास होता. याच दरम्यान त्याने भारतीय नागरिक असल्याचे बोगस दस्तावेज बनविल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
अमोल मुरलीधर म्हात्रे हे नवी मुंबईतील एटीएसमध्ये पोलीस हवालदार म्हणून कामाला आहेत. गेल्या वर्षी काळाचौकी युनिटने काही बांगलादेशी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर नवी मुंबई एटीएसकडे सोपविण्यात आला होता. हा तपास सुरु असताना मुंबई शहरात काही बांगलादेशी नागरिक राहत असून त्यांनी भारतीय नागरिक असल्याचे बोगस दस्तावेज बनविले आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने अशा प्रकारे अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना काही बांगलादेशी जे. जे मार्ग येथील एका टुल्स ऍण्ड हार्डवेअर दुकानात सेल्समन म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने जे. जे मार्ग पोलिसांच्या मदतीने मटण स्ट्रिट, बोरा मशिदीजवळील एस. कासमअली ब्रॉस या टुल्स ऍण्ड हार्डवेअर दुकानातून सिराज शेख याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीदरम्यान तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले.
बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून तो नोकरीसाठी १९ वर्षांपूर्वी कुठल्याही वैध कागदपत्राविना बेनापोल सीमेवरुन मुंबईत आला होता. नोकरीच्या शोधात असताना त्याला अली मनासावाला यांच्या दुकानात सेल्समन म्हणून नोकरी मिळाली होती. त्यासाठी त्याला अठरा हजार वेतन दिले जात होते. बांगलादेशी नागरिक असल्याची ओळख लपविण्यासाठी त्याने मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर, वशीकरण गार्डनजवळील इंदिरा नगर रहिवाशी संघ या पत्त्यावर पॅनकार्ड, आधारकार्ड आणि निवडणुक ओळखपत्र बनविले होते. १९ वर्षांत तो अनेकदा बांगलादेशात गेला आणि तेथून परत भारतात आला होता. तिथेच त्याची त्याची आई, पत्नी आणि दोन मुले राहत असून त्याच्या वडिलांचे १९९८ साली निधन झाले होते. अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी नवी मुंबईत नेण्यात आले. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याच्या संपर्कात इतर कोणी बांगलादेशी नागरिक आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.