मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
17 एप्रिल 2025
मुंबई, – मुंबई शहरात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना किल्ला कोर्टाने दोषी ठरवून तीन महिने साधा कारावास आणि एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद शाहिद अस्लम शेख, मोहम्मद सलाम हुसैन ऊर्फ सलाम शरीफ आणि रमजान मोहम्मद हुसैन ऊर्फ रमजान मोहम्मद शरीफ अशी या तिघांची नावे आहेत. शिक्षा संपताच या तिघांना बांगलादेशात पाठविण्यात येणार आहे.
मुंबई शहरात काही बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त होताच गुन्हे शाखेने अशा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना वेगवेगळ्या परिसरातून मोहम्मद शाहिद, मोहम्मद सलाम आणि रमजान मोहम्मद या तिघांना पोलिसांनी अटक केली. या तिघांच्या चौकशीत ते तिघेही बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले होते. बांगलादेशातील गरीबीसह बेरोजगारीला कंटाळून ते भारतात पळून आले होते. गेल्या काही वर्षांपासून ते भारतात वेगवेगळ्या शहरात वास्तव्यास होते. गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत नोकरीसाठी आले होते.
याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. तेव्हापासून ते तिघेही न्यायालयीन कोठडीत होते. या तिघांविरुद्ध नंतर आरोपपत्र सादर करण्यात आले होते. त्याची नियमित सुनावणी अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी आठवे कोर्टा के. एस झंवर यांच्यासमोर सुरु होती. अलीकडेच त्यांनी तिन्ही बांगलादेशी नागरिकांना दोषी ठरविले.
त्यापैकी मोहम्मद शाहिदला तीन महिने बारा दिवस साधी कैद तर एक हजार रुपयांचा दंड तर मोहम्मद सलाम आणि रमजान मोहम्मद यांना दोन महिने बावीस दिवस साधी कैद व एक हजार रुपयांचा दंड, दंडाची रक्कम न भरल्यास तिघांना आणखीन चार दिवस कारावास भोगावा लागणार आहे. शिक्षा संपल्यानंतर त्यांना त्यांच्या मायदेशात पाठविण्यात यावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे, कोर्ट कारकून पांचाळ यांनी ही कारवाई केली.