मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – बांगलादेशातील ढाका येथे जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या पुतुल बेगम मोहम्मद मोकलेश या ३७ वर्षीय बांगलादेशी महिलेला इमिग्रेशन अधिकार्यांनी ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. तिच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत तिला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावलीद आहे. चार वर्षांपूर्वी बांगलादेशातून पळून भारतात आल्यानंतर तिने एका भारतीय नागरिकाशी विवाह करुन बोगस पासपोर्ट बनविल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
बदलापूरचे रहिवाशी असलेले मदन जयराम कांबळे हे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. रविवारी त्यांची नाईट ड्युटी होती. दुसर्या दिवशी सकाळी पाच वाजता एक महिला इमिग्रेशन तपासणीसाठी आली होती. तिला ढाका येथे जायचे होते, तिच्याकडे भारतीय पासपोर्ट होते. या पासपोर्टवरुन ती अनेका बांगलादेशात गेल्याचे दिसून आले. त्यामुळे बांगलादेशात जाण्यामागील कारणाविषयी विचारणा केल्यानंतर तिला काहीच उत्तर देता आले नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीदरम्यान तिने बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. तिने मोहम्मद मोकलेश या बांगलादेशी नागरिकाशी विवाह केला होता. त्याच्यापासून त्याला दोन मुले आहेत. पतीसोबत पटत नसल्याने ती चार वर्षांपूर्वी भारतात आली होती. अहमदाबाद येथे वास्तव्यास असताना तिने भावेशकुमार मिस्त्री या भारतीय नागरिकाशी विवाह केला होता. त्याच्याशी विवाह केल्यानंतर तिने त्याच्या नावाने आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनविले होते. या कागदपत्राच्या आधारे तिने पासपोर्टसाठी अर्ज केला, त्यानंतर तिला भारतीय पासपोर्ट मिळाले होते. याच पासपोर्टवर ती तिच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी बांगलादेशात जात होती.
भारतात अवैधरीत्या प्रवेश करुन बोगस कागदपत्रांच्या आधारे तिने भारतीय पासपोर्ट मिळविले, याच पासपोर्टवर मुंबई- ढाका आणि ढाका-मुंबई असा तिने अनेकदा प्रवास केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे तिला पुढील चौकशीसाठी सहार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. याप्रकरणी इमिग्रेशन अधिकारी मदन कांबळे यांच्या तक्रारीवरुन पुतुल बेगमविरुद्ध सहार पोलिसांनी भारतीय न्याय सहिता सहकलम विदेशी व्यक्ती व पासपोर्ट अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.