बस निरीक्षकाला कानशिलात लगावणार्या प्रवाशाला अटक
गर्दीमुळे पुढे जाण्यास सांगितले म्हणून मारहाण केल्याची कबुली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० एप्रिल २०२४
मुंबई, – गोराई बस डेपोमध्ये बस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दिपक काशिनाथ हरवंडकर यांना कालशिलात लगावून सारकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका प्रवाशाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. जिग्नेश हिम्मतभाई वाला असे या आरोपी प्रवाशाचे नाव असून अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले आहे. गर्दीमुळे इतर प्रवाशांप्रमाणे जिग्नेशला पुढे जाण्यास सांगितले म्हणून त्याने रागाच्या भरात मारहाण केल्याची कबुली दिली आहे.
दिपक हरवंडकर हे भाईंदर येथे राहत असून बेस्टमध्ये बस निरीक्षक म्हणून कामाला आहे. सध्या त्यांची नेमणूक बोरिवलीतील गोराई बस डेपोमध्ये आहे. त्यांच्यावर विनातिकिट बसमधून प्रवास करणार्या प्रवाशांविरुद्ध कारवाई करणे, गर्दी नियंत्रण करुन त्यांना लाईनमध्ये उभे करणे, प्रवाशांना बस प्रवासादरम्यान कुठलीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेणे, बसमध्ये गर्दी होत असल्यास ती गर्दी नियंत्रण करणे अशी जबाबदारी आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता ते न्यू. एमएचबी कॉलनी येथून २४४ क्रमांकाच्या बोरिवली येथून गोराई व नंतर कांदिवलीच्या दिशेने जाणार्या एका बसमध्ये चढले होते. यावेळी त्यांच्यासोबत हंगामी बस निरीक्षक जगन्नाथ परशु पोळ हे होते. बसमधील प्रवाशांचे तिकिट तपास पाहत असताना गर्दीमुळे त्यांनी काही प्रवाशांना पुढे जाण्यास सांगितले. याच दरम्यान एका तरुणाने त्यांच्या कानशिलात जोरात चापट मारली. त्यामुळे चालकाने बस थांबवली. काही वेळानंतर इतर प्रवाशांना कानशिलात लगावणार्या तरुणाला पकडून मारहाण करण्याचा प्रयत्न केा. मात्र त्यांनी त्यांना थांबवून त्याला बोरिवली पोलीस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान मारहाण करणार्या तरुणाचे नाव जिग्नेश वाला असल्याचे उघडकीस आले. तो बोरिवलीतील गोराई, सिद्धीविनायक सोसायटीमध्ये राहत होता. चौकशीत जिग्नेश हा मागच्या दरवाज्याने बसमध्ये चढला होता, गर्दीमुळे त्याला हलता येत नव्हते. त्यात दिपक हरवंडकर यांनी त्याला पुढे जाण्यास सांगितले होते. त्याचा राग आल्याने त्याने त्यांच्या कानशिलात लंगावून सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी जिग्नेश वालाविरुद्ध ३५३ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.