घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा तपास अखेर गुन्हे शाखेकडे वर्ग

भावेश भिंडेला पोलीस कोठडी; अनेक धक्कादायक खुलासे होणार

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ मार्च २०२४
मुंबई, – सोमवारी सायंकाळी घाटकोपर परिसरात झालेल्या होर्डिंग दुर्घटनेचा तपास पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर पंतनगर पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात असून याच गुन्ह्यांत राजस्थान येथून अटक केलेल्या भावेश भिंडे याला नंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने त्याला २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेने अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.

सोमवारी मुंबई शहरात झालेल्या अवकाळी वादळ वार्‍यासह पावसामुळे घाटकोपरच्या छेडानगरचा एक होर्डिंग जवळच असलेल्या पेट्रोलपंपावर कोसळले होते. त्यात सोळाजणांचा मृत्यू झाला होता तर ऐंशीहून अधिक लोक जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर पंतनगर पोलिसांनी युगो कंपनीचे भावेश भिंडेसह इतर आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधासह भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच भावेश हा पळून गेला होता. त्याच्या घरासह कार्यालयात पोलिसांनी छापा टाकला होता. मात्र तो मुंबईतून पळून गेल्याचे लक्षात येताच त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे सात विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच भावेशला गुरुवारी राजस्थानच्या उदयपूरमधील एका हॉटेलमधून गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले होते. हॉटेलमध्ये तो भावेश पुजारा या नावाने राहत होता. याच नावाने त्याने हॉटेलचे रुम बुक केले होते. शुक्रवारी पहाटे त्याला राजस्थानातून मुंबईत पुढील चौकशीसाठी आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांचा तपास नंतर पंतनगर पोलिसांकडून गुन्हे शाखेच्या युनिट सातकडे सोपविण्यात आले. गुन्ह्यांचे सर्व कागदपत्रे हाती येताच गुन्हे शाखेने भावेशला अटक केली होती. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते.

यावेळी पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी भावेशच्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्याच्या कंपनीचे शहरात इतर होर्डिंग असून या तिन्ही होर्डिंगची माहिती जात काढली आहे. एका होर्डिंगसाठी पाच कोटी लागत असून त्याच्या आर्थिक व्यवहाराची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या गुन्ह्यांत त्याच्यासोबत इतर काही संचालकाची भूमिका पडताळून पाहिली जाणार आहे. या होर्डिंगसाठी त्याला कशा प्रकारे परवान्या मिळाल्या. त्या परवानगी कोणी दिल्या. त्यात काही आर्थिक व्यवहार झाले होते. होर्डिंगचे बांधकाम करताना निकृष्ठ दर्जाचे बांधकाम करण्यात आल्याचा संशय असून त्याचा तपास बाकी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. २०१३ साली झालेल्या ऑडिटमध्ये ते स्ट्रक्चर उत्तम दर्जाचे असल्याचे नमूद करण्यात आले. त्यात त्याची उंची, लांबी, रुंदी आणि इतर गोष्टीचा उल्लेख करण्यात आल्याचा दावा आरोपीचे वकिल रिझवान मर्चंट यांन केला. भावेश हा २०२३ पर्यंत कंपनीचा संचालक होता. मात्र नोव्हेंबर २०२२ साली ते युगो कंपनीला देणयात आले होते. त्यामुळे या दुर्घटनेलला भावेश जबाबदार नाही. या गुन्ह्यांत ३०४ कलम लागू शकत नाही असे युक्तीवाद करताना आरोपीला अटक करताना पोलिसांनी नियमांचे पालन केले नाही असा आरोपही रिझवान मर्चंट यांनी केला. दोन्ही बाजू ऐकल्यांनतर न्यायालयाने भावेशला २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता भावेशची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page