मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२१ मार्च २०२४
मुंबई, – कचरा वेचण्याचा बहाणा करुन दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळेस बाईक चोरी करणार्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला डी. बी मार्ग पोलिसांनी अटक केली. प्रथमेश किसन शिंदे असे या २२ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने बाईक चोरीच्या पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांतील पाच चोरीचे बाईक पोलिसांनी हस्तगत केल्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले.
२२ फेब्रुवारी ते १ मार्च २०२४ या कालावधीत ग्रँटरोड येथील बाळाराम स्ट्रिट, सिधवा इमारत कंपाऊंडमध्ये पार्क केलेली तक्रारदाराची बाईक अज्ञात चोरट्याने पळवून नेली होती. १ मार्चला हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी डी. बी मार्ग पोलीस ठाण्यात बाईक चोरीची तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. गेल्या काही दिवसांत बाईक चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाल्याने पोलीस उपायुक्त मोहीतकुमार गर्ग, सहाय्यक पोलीस आयुक्त रवी सरदेसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय घोरपडे यांनी गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन झाडे, पोलीस हवालदार अशोक पाटील, पोलीस शिपाई रामभाऊ सांगळे, मयुर पालवणकर, शेखर अभंग, दिपक डावरे, संतोष कदम यांनी आरोपींचा शोध सुरु केला होता.
परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने विलेपार्ले येथील नेहरुनगर परिसरातून प्रथमेश शिंदे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तो बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले होते. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या पाच बाईक हस्तगत केल्या आहेत. या बाईक त्यांनी ग्रँटरोड, वाशी, कफ परेड आणि नालासोपारा येथून चोरी केल्याचे उघडकीस आले. प्रथमेश हा विलेपार्ले येथील नेहरुनगर, गल्ली क्रमांक तीन परिसरात राहत असून कचरा वेचण्याचे काम करतो. दिवसा रेकी केल्यानंतर तो रात्रीच्या वेळेस बाईकची चोरी करुन पलायन करत होता. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या चौकशीतून बाईक चोरीचे इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.