जिवाला धोका असल्याची बतावणी करुन महिलेची फसवणुक
५३ लाखांसह दागिन्यांचा अपहार; सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२७ मार्च २०२४
मुंबई, – जादूटोणाद्वारे मुलासह कुटुंबियांच्या जिवाला धोका तसेच गुंतवणुकीच्या आत्महत्येची भीती दाखवून एका महिलेकडून सुमारे ५३ लाखांसह २३ तोळे दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक झाल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका मुख्य आरोपीसह सहाजणांविरुद्ध बोरिवली पोलिसांनी भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. विजय बाळू जोशी, रचना प्रशांत दळवी, निलेश जयसिंग माने, किशोर विलास तावडे, रुचिता चंद्रकांत चव्हाण आणि प्रथमेश मयेकर अशी या सहाजणांची नावे आहेत.
५७ वर्षांची तक्रारदार महिला बोरिवलीतील शिंपोली परिसरात राहत असून तिने बीकॉमसह एमबीए, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्राचा कोर्स केला आहे. ज्योतिषशास्त्राचा कोर्स करताना तिची सुभाष ब्रिद, अमोल खोत यांच्याशी ओळख झाली होती. २०१९ साली ज्योतिषशास्त्राची माहिती घेण्यासाठी ती नाशिकला गेली होती. यावेळी तिच्यासोबत सुभाषसह विजय जोशी हेदेखील होते. सुभाषनेच तिची ओळख विजय जोशीशी करुन दिली होती. तो प्रचंड हुशार असून त्याच्याकडे विशेष ज्योतीविद्या असून तो काही माहिती नसताना समोरचा व्यक्तीचा चेहरा बघून संपूर्ण माहिती सांगतो असे सांगितले होते. कोणाला मूल होत नाही तर त्याच्या सल्ल्यानंतर मूल होते, जन्मापूर्वीच तो मुलाची पत्रिका काढतो. कुठलेही कठीण आणि न होणारे काम तो सहज करुन देतो असे सांगितले होते. त्यानंतर ते तिघेही बोरिवलीतील शिवशंभू मंदिरात नियमित सोमवारी भेटत होते. त्याच्याकडून तिची इतर आरोपींशी ओळख मंदिरात ओळख झाली होती. २०२० साली निलेश माने, प्रथमेश पंडित आणि विजय जोशी यांनी सीएसटी नावाचे एक हॉटेल सुरु केले होते. ते हॉटेल निलेशच्या नावावर होते. एक वर्षांनी विजयने मिरारोड येथे स्वतचे ज्योतिष कन्सलटन्सीचे एक कार्यालय सुरु केले होते. त्यासाठी त्याला वेबसाईट सुरु करायची होती. त्यामुळे त्यांनी वेबसाईटसाठी त्यांची मदत घेतली होती. त्यानंतर विजयने हॉटेलसह इतर कामासाठी तिच्याकडे उसने पैसे घेतले होते. त्याच्यावर विश्वास असल्याने तिनेही त्याला पैशांची मदत केली होती.
काही दिवसांनी त्यांनी हॉटेलच्या एका पार्टनरला देण्यासाठी तिच्याकडे ८० लाखांची मागणी केली. मात्र तिने त्याला पैसे देण्यास नकार दिला. यावेळी विजयने तिने पैसे दिले नाहीतर संबंधित पार्टनरचे चारही मुले आत्महत्या करतील असे सांगितले. त्यामुळे तिने त्याला व्याजाने काढून पैसे दिले होते. त्यानंतर त्याने अन्य एका व्यावसायिकासाठी तिच्याकडून पैसे उकाळले होते. अशा प्रकारे विविध कारण सांगून तो तिच्याकडून पैसे घेत होता. काही दिवसांनी त्याने तिला तिच्या मुलाविषयी चुकीची माहिती देण्यास सुरुवात केली. त्याला मुलीचे वेड आहे. तो हुक्का ओढतो, मोठेपणा करतो. तो कोणाचाही अपमान करतो. स्वतला शेठ संतो. त्याच्या पत्रिकेत धोका. त्याच्यापासून तुमच्या घराला धोका आहे. त्यामुळे त्याला घरापासून लांब ठेवा. अनेकदा तो भेटल्यानंतर तो तिच्या मुलाविषयी वाईट गोष्टी सांगत होता. त्यामुळे तिच्या मनावर प्रचंड परिणाम झाला होता. तिच्या मनात तिच्या मुलाविषयी द्वेष निर्माण झाला आणि तिने त्याला स्वतपासून दूर केले होते. काही दिवसांनी त्याने एका महिलेचे दागिने सोडविण्यासाठी तिच्याकडे दहा लाखांची ामगणी केली. मात्र तिने पैसे देण्यास नकार देताच त्याने तिच्याकडून २३ तोळे दागिने घेतले होते. या दागिन्यांवर त्याने इतर आरोपींच्या मदतीने गोल्ड लोन घेतले होते. मात्र वांरवार विचारणा करुनही त्याने तिचे पैसे किंवा दागिने परत केले नाही.
याच दरम्यान तिला विजयने तिच्याकडून विविध लोकांसाठी पैसे घेऊन त्यांना पैसे दिले नसल्याचे समजले. आपण आत्महत्या करणार आहोत असे बोलले नसल्याचे सांगून विजयने त्यांची दिशाभूल करुन पैशांसाठी फसवणुक केल्याचे सांगितले. त्यामुळे तिने पुन्हा त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र त्याने तिच्याकडून घेतलेले सुमारे ५३ लाखासह २३ तोळे परत केले नाही. तिच्या मुलाची पत्रिका खराब आहे, त्याला त्याच्या व्यवसायात कधीच यश येणार नाही. किडे पडून तो मरेल अशी भीती घालून तिला तिच्या मुलापासून वेगळे केले. तिच्या घरी दोन प्रेते होतील अशी भिती घातली आणि पतीला भरचौकात मारहाण करण्याची धमकी दिली. त्याचे १४९ भाऊ असून ते प्रथम तिच्या मुलाला आणि नंतर त्यांना मारुन टाकतील अशी जादूटोण्यामार्फत जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तिने विजय जोशीसह इतर आरोपीविरुद्ध बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विजय जोशीसह इतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीच्या भादवीसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ, अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबात आणि त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.