४९ लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील तोतया सिनेदिग्दर्शकाला अटक

मनपा कोट्यातील फ्लॅटच्या आमिषाने सहाजणांना गंडा घातल्याचा आरोप

0

अरुण सावरटकर
१८ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – सुमारे ४९ लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या विठ्ठल सदानंद वेतूरकर या तोतया सिनेदिग्दर्शकाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत मयुरी ऊर्फ उन्नती तेजस डेरे ऊर्फ मसुरी, रामचंद्र गणपत चव्हाण व अन्य एका अज्ञात व्यक्तीला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून या टोळीने तक्रारदार महिलेसह पाचजणांना बोरिवलीतील महानगरपालिकेच्या कोट्यातील फ्लॅट देण्याच्या आमिषाने गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

मानसी मदन कवठणकर ही महिला तिच्या मुलीसोबत सांताक्रुजच्या धोबीघाट, वाकोला परिसरात राहत असून कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते. दोन वर्षांपासून ती नवीन घराचा शोध घेत होती. त्यासाठी तिने तिच्या परिचित रमेश सालियनला सांगितले होते. त्यानेच तिची ओळख विठ्ठल वेतूरकरशी करुन दिली होती. सांताक्रुजच्या एका हॉटेलमधील भेटीत त्याने तिला तो सिनेदिग्दर्शक असून त्याच्या परिचित उन्नती डेरे ही मुख्यमंत्री यांची ओएसडी आहे. तिची महानगरपालिकेत ओळख आहे. तिच्याच ओळखीतून बोरिवलीतील मनपा कोट्यातून तिला १९ लाखांमध्ये एक रुम देण्याचे आश्‍वासन दिले होते.

तिचा विश्‍वास बसावा म्हणून त्याने तिला दुसर्‍या दिवशी बोरिवलीतील डॉन बॉस्को शाळा, फायर बिग्रेड इमारतीजवळील वझिरानाका, न्यू रिहॅबिटीलेशन इमारत, लोटस सहकारी सोसायटीत आणले होते. तिथेच त्याने तिला एक रिकामा रुम दाखविला होता. तिच्यासह त्यालाही तिथे असाच रुम मिळणार आहे असे सांगितले. सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तिला सहा महिन्यांत रुमचा ताबा मिळेल असे सांगितले. त्यानंतर तिने त्याला मनपाच्या नावाने ६७ हजाराचा डीडी दिला होता. या डीडीनंतर त्याने तिला मनपाचा लोगो असलेली एक पावती दिली होती. काही महिन्यांत तिने त्यांना टप्याटप्याने ९ लाख ६७ हजार रुपये दिले होते.

तिच्यासह त्यांनी इतर पाचजणांकडून रुमसाठी पैसे घेतले होते. त्यांनाही मनपा कोट्यातील फ्लॅट देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यात मानसी शिरोडकर हिच्याकडून २३ लाख ६७ हजार, सारा लोंबो हिच्याकडून १० लाख ६७ हजार, निखिल गावकर आणि समीर सावंत याच्याकडून प्रत्येकी ५ लाख ६७ हजार असे ५५ लाख ३५ हजाराचे पेमेंट आरोपींनी घेतले होते. जून २०२४ रोजी उन्नतीने मानसी कवठणकर, मानसी शिरोडकर आणि सारा लोबो यांना मनपा मुख्यालयात बायोमेट्रीकसाठीब बोलाविले होते. मात्र बायोमेट्रीक मशिन बंद असल्याचे सांगून त्यांना घरी पाठविण्यात आले होते. याच दरम्यान त्यांना वेगवेगळ्या दिवशी मुख्यालयात बोलावून तिथे त्यांना रुम देत असल्याची प्रक्रिया सुरु असल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता.

मात्र प्रत्यक्षात त्यांना रुमचा ताबा मिळाला नाही. आरोपी वेेगवेगळे कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. दोन वर्ष उलटूनही त्यांनी त्यांना रुमचा ताबा दिला नाही. त्यामुळे त्यंानी रुमचा व्यवहार रद्द करुन त्यांच्याकडून रुमसाठी घेतलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांना दोन धनादेश दिले होते, मात्र ते दोन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले होते. त्यानंतर त्यांनी काही रक्कम परत केली, मात्र उर्वरित ४९ लाख ६७ हजार रुपये परत केले नाही. हा संपूर्ण व्यवहार बोगस वाटत असल्याने त्यांनी मनपा कार्यालयात त्यांना वाटप केलेल्या रुमचे दस्तावेज सादर करुन त्याची शहानिशा केली होती. त्यात त्यांनी सादर केलेले सर्व कागदपत्रे बोगस असून त्यांना मनपाने त्यांच्या कोट्यातील कुठलीही रुम अलोट केली नसल्याचे सांगण्यात आले.

मनपाकडून आलेल्या उत्तरानंतर मानसीसह इतर पाचजणांना धक्काच बसला होता. महानगरपालिकेचे बोगस लेटरहेडवर त्यांनी रुम अलोट झाल्याचे सांगून त्यांच्याकडून घेतलेल्या ४९ लाख ६७ हजाराचा परस्पर अपहार करुन ही फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विठ्ठल वेतूरकर, मयुरी डेरे, रामचंद्र चव्हाण व इतर आरोपीविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.

ही शोधमोहीम सुरु असताना तीन दिवसांपूर्वी या कटातील तोतया सिनेदिग्दर्शक विठ्ठल वेतूनकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने इतर आरोपींच्या मदतीने ही फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे गुन्ह्यांतील इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page