मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ सप्टेंबर २०२४
मुंबई, – महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून नोकरीच्या आमिषाने एका वयोवृद्ध महिलेसह तिच्या मुलाची एका त्रिकुटाने दहा लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार माहीम परिसरात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या मुलाला तो महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून रुजू झाल्याचे सांगून वांद्रे येथील रस्त्यावर नऊ महिने सफाई कर्मचारी म्हणून काम करण्यास प्रवृत्त केले, मात्र नऊ महिने काम करुनही त्याला वेतन दिले होते. मनपा कार्यालयात चौकशी केल्यानंतर त्याचा सफाई कर्मचारी म्हणून कुठेही नोंद नसल्याचे उघडकीस आल्यानंतर बोगस नोकरीचा हा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर वयोवृद्ध महिलेच्या तक्रारीवरुन माहीम पोलिसांनी तीन भामट्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. जितेंद्र सोलंकी, मनोज जाधव आणि सुरेश मकवाना अशी या तिघांची नावे असून पळून गेलेल्या या तिघांचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.
माहीम येथे वयोवृद्ध तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहते. ती सफाई कर्मचारी म्हणून काम करत असून तिच्या पतीचे निधन झाले आहे. तिच्या मुलाला चांगली नोकरी मिळावी यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान तिच्या परिचित एका व्यक्तीने त्याच्या मित्राची महानगरपालिकेत चांगली ओळख आहे. तो तिच्या मुलाला हमखास नोकरी मिळवून देईल असे सांगितले. त्यामुळे त्याच्या सांगण्यावरुन तिने जितेंद्र सोलंकीची भेट घेतली होती. त्याने महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकार्यांशी चांगले संबंध असल्याचे सांगून त्यांच्या मदतीने तिच्या मुलाला महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. या नोकरीसाठी दहा लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले. तिने दहा लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे तिने जितेंद्रला कॅश आणि धनादेशद्वारे प्रत्येकी पाच लाख असे दहा लाख रुपये दिले होते. यावेळी जितेंद्रने तिची ओळख मनोज जाधव आणि सुरेश मकवाना यांच्याशी करुन दिली होती. या दोघांच्या मदतीने तिच्या मुलाला ही नोकरी मिळणार असल्याचे सांगितले होते.
२०१६ रोजी त्यांनी तिला मुलाची नोकरी लागल्याचे सांगून मेडीकलनंतर तातडीने कामावर रुजू व्हावे लागेल असे सांगितले. त्यामुळे तो मेडीकलसाठी भाभा हॉस्पिटलमध्ये आला होता. मेडीकलनंतर त्याला वांद्रे येथील कार्टररोड, अल्मेडा पार्क परिसरात सफाई कर्मचारी म्हणून नोकरीवर ठेवण्यात आले होते. मात्र महिना उलटूनही त्यांनी त्याला पगार दिला नाही. यावेळी या दोघांनी प्रशासकीय कारण सांगून पगारासाठी थोडा वेळ लागेल असे सांगितले. अशा प्रकारे त्यांनी त्याच्याकडून अकरा महिने सफाई कर्मचारी म्हणून काम करुन घेतले. मात्र त्याला पगार दिला नाही. पगाराविषयी विचारणा केल्यानंतर ते दोघेही त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होते. नंतर त्यांनी त्याचा फोन घेणे बंद केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने वांद्रे येथील महानगरपालिका कार्यालयात जाऊन चौकशी केली होती. यावेळी सफाई कर्मचारी म्हणून त्याचे नाव नसल्याचे त्याला समजले.
या तिघांनी सफाई कर्मचारी म्हणून महानगरपालिकेत नोकरी लावतो असे सांगून त्याला अकरा महिने वांद्रे परिसरात सफाई कर्मचारी म्हणून काम करण्यास प्रवृत्त करुन त्याची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच या महिलेने माहीम पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जितेंद्र सोलंकी, मनोज जाधव आणि सुरेश मकवाना या तिघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.