मालेगाव बॉम्बस्फोट कोर्टात बॉम्बस्फोटाची धमकीने खळबळ
न्यायालयीन कर्मचार्याच्या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – दक्षिण मुंबईतील विशेष दिवाणी आणि सत्र न्यायालयातील मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटला सुरु असलेल्या विशेष एनआयए कोर्टात बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र संपूर्ण न्यायालयाची तपासणी केल्यानंतर ती अफवा असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी न्यायालयीन कर्मचार्याच्या तक्रारीवरुन कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध बॉम्बस्फोटाची धमकी देऊन तणावाचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा कुलाबा पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसकडून संमातर तपास सुरु आहे.
२९ सप्टेंबर २००८ साली मुंबईपासून दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या मालेगावातील एका मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाला होता. एका बाईकमध्ये हा बॉम्ब ठेवून त्याचा स्फोट घडविण्यात आला होता. त्यात सहा निरपराध व्यक्तींचा मृत्यू झाला होता तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते. या घटनेची केंद्रासह राज्याच्या गृहविभागाने गंभीर दखल घेत राज्य एटीएसला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर एटीएसने अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. याच गुन्ह्यांत नंतर भाजप नेत्या प्रज्ञा ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितासह इतर पाचजणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कदायक खुलासे करण्यात आले होते. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास नंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) सोपविण्यात आला होता. या आरोपीविरुद्ध नंतर आरोपपत्र सादर करण्यात आले होते. खटल्याची सुनावणी सध्या विशेष एनआयए कोर्टात सुरु असून आरोपींची अंतिम जबानी नोंदविण्याचे काम सुरु आहे.
३० ऑक्टोंबरला विशेष सेशन कोर्टातील रजिस्ट्रार कार्यालयात एका अज्ञात व्यक्तीने फोन केला होता. त्याने मालेगाव बॉम्बस्फोट खटला सुरु असलेल्या विशेष एनआयए कोर्टात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी दिली होती. ही माहिती नंतर न्यायालयीन कर्मचार्यांकडून कुलाबा पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर कुलाबा पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक पथकाने श्वान पथकाच्या मदतीने संपूर्ण न्यायालयाची तपासणी केली होती. मात्र तिथे काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नव्हती. बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस येताच अज्ञात व्यक्तीविरुद्ध कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. या धमकीची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून गुन्ह्यांचा तपासासाठी गुन्हे शाखेसह एटीएसला काही सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.