मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – कायदेविषयक सल्ला देणार्या एका खाजगी कार्यालयात बॉम्ब असल्याचा मेलमुळे एकच खळबळ उडाली होती. कंपनीच्या लोअर परेल आणि फोर्ट येथील कार्यालयात बॉम्ब ठेवल्यात आल्याची धमकी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला प्राप्त झाली होती. दोन्ही कार्यालयाची तपासणी केल्यानंतर बॉम्ब ती अफवा असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी ना. म जोशी मार्ग पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
लोअर परेल येथील कमला मिलजवळील जेएफए लॉ फर्म, जेएसए कार्यालयात संदीप श्रीवास्तव हे ऍडमिन मॅनेजर म्हणून कामाला आहे. गुरुवारी सव्वाबारा वाजता त्यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल केला होता. यावेळी त्यांनी त्यांच्या कार्यालयातील कंपनीच्या मेलवर फरजान अहमद नावाच्या एका व्यक्तीने मेल पाठविला असून त्यात त्याने त्यांच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. ही घटना ताजी असताना काही वेळानंतर त्यांच्या फोर्ट येथील बॅलार्ड इस्टेट, वकिल हाऊसमधील जे. सागर असोशिएटमध्ये अशाच प्रकारे एक मेल प्राप्त झाला होता. यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती. मेलवरुन आलेल्या या धमकीनंतर ना. म. जोशी मार्ग आणि एम. आर ए मार्ग पोलिसांनी दोन्ही कार्यालयात धाव घेतली होती. दोन्ही कार्यालयाची बॉम्बशोधक व नाशक पथकासह श्वान पथकाने तपासणी केली होती. मात्र तिथे काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. त्यामुळे बॉम्ब असल्याची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी संदीप श्रीवास्तव यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा मेल कोणी आणि कोठून पाठविला याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. या गुन्ह्यांत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेसह सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु आहे.