केबल चोरीचा प्रयत्न गस्त घालणार्‍या पोलिसांनी हाणून पाडला

दोन आरोपींना अटक तर तिसरा सहकारी पळून गेला

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – वांद्रे येथील बीकेसी, महानगर टेलिफोन निगम लिमिटेड सिग्नलजवळ जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर खोदकाम करुन केबल चोरीचा प्रयत्न गस्त घालणार्‍या बीकेसी पोलिसांच्या एका विशेष पथकाने हाणून पाडला. याच गुन्ह्यांत दोन आरोपींना पोलिसांना अअक केली आहे. रेहमानअली मोहरअली आणि फकरुद्दीन मोहम्मद हदीस शाह अशी या दोघांची नावे आहेत. कारवाईदरम्यान त्यांचा तिसरा सहकारी कमरुद्दीन मोहम्मद हदीस शाह हा पळून गेला असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींना वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

कैलास धोंडू लोहार हे कुर्ला येथे राहत असून सध्या बीकेसी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. रविवारी सकाळी ते दिवसपाळीवर हजर झाले होते. सायंकाळी सहा वाजता ते त्यांच्या सहकार्‍यासोबत परिसरात गस्त घालत होते. वांद्रे येथील बीकेसी, एमटीएनएल सिग्नलजवळ गस्त घालताना पोलिसांना काहीजण तिथे जेसीबीच्या मदतीने रस्त्याच्या बाजूने खोदकाम करत असल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी तिथे जाऊन चौकशी केली होती. यावेळी तीनपैकी एक आरोपी काही बोलण्यापूर्वीच पळून गेला. त्यामुळे तिथे असलेल्या दोन्ही व्यक्तींची पोलिसांनी चौकशी सुरु केली होती.

चौकशीदरम्यान एकाचे नाव रेहमानअली असून तो जेसीबी चालक म्हणून तर दुसरा फकरुद्दीन शाह हा भंगार विक्रेता असल्याचे उघडकीस आले. तपासात ते तिघेही तिथे जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुन केबल चोरीच्या उद्देशाने आले होते. चोरी केलेल्या केबलची नंतर ते तिघेही विक्री करणार होते. त्यामुळे या दोघांनाही पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. केबल चोरीच्या उद्देशाने ते तिघेही तिथे आले होते, मात्र पोलिसांना पाहताच त्यांचा तिसरा सहकारी कमरुद्दीन शाह हा पळून गेला होता. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी विविध भारतीय न्याय सहिता कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

याच गुन्ह्यांत नंतर रेहमानअली आणि फकरुद्दीन शाह या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही ठिकाणी केबल चोरीचा प्रयत्न केला होता का याचा पोलीस तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page