फसवणुकीच्या गुन्ह्यांत फायनान्स कंपनीच्या कर्मचार्याला अटक
पॉलिसी बंद करुन पेंशनच्या बहाण्याने वयोवृद्धेला घातला होता गंडा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांत एका नामांकित खाजगी फायनान्स कंपनीच्या कर्मचार्याला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. आशिष कमलेश तिवारी असे या कर्मचार्याने नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पॉलिसी बंद करुन रक्कम बँकेत ट्रान्स्फर करुन पेंशन सुरु करण्याचा बहाणा करुन एका वयोवृद्ध महिलेची आशिषने सुमारे सात लाखांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
ललिता अशोक मल्होत्रा ही 69 वर्षांची वयोवृद्ध महिला मालाडच्या एव्हरशाईन नगरात राहते. तिचा मुलगा विदेशात नोकरी करत असून ती तिच्या राहत्या घरी दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्याचे खाजगी ट्यूशन घेते. डिसेंबर 2023 साली तिने एका खाजगी कंपनीची पाच वर्षांसाठी पॉलिसी घेतली होती. त्याचा पहिला हप्ता तिने भरला होता, दुसरा हप्ता भरण्यासाठी तिला आशिष तिवारी याने कॉल केला होता. मात्र तिने दुसरा हप्त भरण्यास नकार देत पॉलिसी बंद करुन त्यासाठी भरलेले पैसे परत करण्याची विनंती केली होती. यावेळी त्याने तिला तुमच्या पॉलिसीचा बोनस आला असून पॉलिसीची व्हयॅल्यू वाढली आहे. तुम्ही पॉलिसीची उर्वरित रक्कम भरल्यास तुम्हाला नोव्हेंबर 2024 पासून पेंशन सुरु होईल असे सांगितले.
त्याच्यावर विश्वास ठेवून तिने त्याला मे 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत 7 लाख 94 हजार 492 रुपये पाठविले होते. ही रक्कम जमा केल्यानंतर त्याने तिची पॉलिसी बंद करुन पॉलिसीची सर्व रक्कम बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत तिने तिची मुलगी मृणालिनी विशाल उपाध्यायला माहिती दिली होती. त्यामुळे तिने अंधेरीतील कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली होती. यावेळी त्यांनी कमलेश हा त्यांच्याच कर्मचारी आहे, मात्र तिच्याकडून घेतलेल्या पॉलिसीची रक्कम त्याने कार्यालयात जमा केली नाही. या पैशांचा त्याने वैयक्तिक फायद्यासाठी वापर केलचे सांगितले.
हा प्रकार समजताच तिने बांगुरनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आशिष तिवारीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर आशिषने तिला तिचे पैसे देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्याने तिला एक लाख रुपये परत केले, उर्वरित रक्कम लवकरात लवकर देतो असे सांगूनही त्याने तिचे उर्वरित 6 लाख 94 हजार 492 रुपये परत केले नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्यालाक कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान या घटनेची संबंधित कंपनीने गंभीर दखल घेत आशिषने अशाच प्रकारे इतर काही पॉलिसीधारकांची फसवणुक केली आहे का याचा तपास सुरु केला आहे.