स्वस्तात कार देतो असे सांगून तिघांची 58 लाखांची फसवणुक
दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या मुख्य आरोपीस अटक
अरुण सावरटकर
15 मे 2026
मुंबई, – महापुराच्या पाण्यामुळे कंपनीच्या नुकसानग्रस्त झालेल्या पाच नवीन कार स्वस्तात मिळवून देतो असे सांगून एका केमिकल व्यावसायिकासह त्यांच्या दोन मित्रांची सुमारे 58 लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या एका मुख्य आरोपीस समतानगर पोलिसांनी अटक केली. चंद्रशेखर नानाभाऊ दासरी चंद्रा दासरी असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल होताच चंद्रा हा पळून गेला होता, गेल्या दिड वर्षांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच त्याला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत किरण गोसावी हा सहआरोपी असून या दोघांनीच संगनमत करुन ही फसवणुुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
50 वर्षांचे आनंद रामगोपाल सिंघानिया हे कांदिवलीतील ठाकूर व्हिलेजमध्ये राहत असून त्यांची स्वतची सोलापूर येथे एक केमिकल फॅक्ट्ररी आहे. त्यांच्याकडे व्यकंटेश चिंताकढी हे कामाला असून ते त्यांच्या फॅक्ट्ररीचे सर्व व्यवस्थापन पाहतात. फेब्रुवारी 2024 रोजी व्यकंटेश हे त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मित्र चंद्रा दासरी हादेखील होता. यावेळी व्यकंटेशने चंद्रा हा त्यांचा मित्र असून तो मूळचा सोलापूरचा रहिवाशी आहे. त्याने त्यांना किया कंपनीचे काही नव्या कार दाखवून त्या कार कंपनीच्या चेन्नईच्या कार्यालयात ठेवल्या आहेत. चेन्नईमध्ये महापुर आल्याने कंपनीचे गोदाम पाण्यासाठी गेले होते. त्यात काही कारचे नुकसान झाले आहे. अशा 39 कार कंपनीने स्वस्तात विक्रीसाठी काढले आहे. त्यापैकी पाच कार त्यांना देण्याचे आश्वासन दिले होते.
याकामी त्याला त्यांचा मित्र किरण गोसावी हा मदत करणार असल्याचे सांगितले. जवळपास 50 टक्के सवलतीच्या दरात नवीन कार मिळत असल्याने त्यांनी कार घेण्यासाठी आपण इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या दोन मित्रांनाही कार घेण्याचा सल्ला दिला होता. 27 फेब्रुवारी ते 28 मार्च 2024 या कालावधीत त्यांच्यासह त्यांचे परिचित मित्र मनिष तिवारी आणि रेणू सिंघानिया यांनी पाच कारसह आरटीओ टॅक्स, इन्शुरन्ससाठी चंद्रा आणि किरण यांना टप्याटप्याने सुमारे 58 लाख रुपयांचे पेमेंट केले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी कारची डिलीव्हरी केली नाही. विचारणा केल्यानंतर ते दोघेही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. आठ महिने उलटूनही त्यांनी कारचा ताबा दिला नाही.
50 टक्के सवलतीच्या दरात नवीन कार देतो असे सांगून या दोघांनी कारसाठी घेतलेल्या सुमारे 58 लाखांचा अपहार करुन फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी चंद्रा दासरी आणि किरण गोसावी यांच्याविरुद्ध समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. त्यामुळे या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या चंद्रा दासरी याला दोन दिवसांपूर्वी समतानगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली.
चौकशीत त्याने किरण गोसावीच्या मदतीने तक्रारदारासह इतर दोघांची फसवणुक केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.