दोन कोटीच्या चांदीच्या साहित्यांचा अपहार करुन फसवणुक

रेकॉर्ड तयार करणारा शोरुमचा व्यवस्थापक गजाआड

0

अरुण सावरटकर
१७ जून २०२६
मुंबई, – बोरिवलीतील ओबेरॉय स्काय सिटी मॉलमधील चांदीच्या शोरुममधील सुमारे दोन कोटीच्या चांदीच्या विविध साहित्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी शोरुमच्या व्यवस्थापकाला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. दिपेश राजेंद्रकुमार जैन असे या आरोपी व्यवस्थापकाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी अपहार केलेले चांदीचे काही साहित्य हस्तगत केल्याचे बोलले जाते. दिपेशने गेल्या सहा महिन्यांत चांदीच्या साहित्यांचा अपहार करताना खरे इलेट्रीक रेकॉर्ड नष्ट करुन बोगस रेकॉर्ड तयार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

राहुल कांतीलाल मेहता चांदी व्यावसायिक असून परळ येथे त्यांच्या वयोवृद्ध आई-वडिल आणि पत्नीसोबत राहतात. त्यांची सिल्वर एम्पोरियल रिटेल प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी असून ही कंपनी चांदीच्या दागिन्यांसह इतर वस्तू बनविते. काळबादेवी परिसरात कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. सप्टेंबर २०२५ रोजी कंपनीने बोरिवलीतील देवीपाडा मेट्रो स्टेशन, स्काय सिटी मॉलमध्ये एक रिटेल शोरुम सुरु केले होते. तिथेच दिपेश जैन हा स्टोअरचा प्रभारी आणि व्यवस्थापक म्हणून काम पाहत होता.

त्याच्यावर शोरुमच्या दैनदिन कामासह दररोज होणार्‍या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी होती. दिपेशचे वडिल राजेंद्रकुमार जैन हे त्यांच्या कंपनीत ४० वर्षांपासून काम करत होते, त्यामुळे त्यांनी दिपेशची त्यांच्याकडे शिफारस केली होती. त्यांच्या आग्रहखातर त्यांनी दिपेशवर शोरुमची जबाबदारी सोपविली होती. मार्च २०२६ साली शोरुमच्या आर्थिक व्यवहाराचे ऑडिट करण्यात आले होते.

ऑडिटमध्ये चांदीच्या विविध विटा, दागिने आणि इतर चांदीचे वस्तू असा सुमारे दोन कोटीचे ६६ किलो चांदी कमी असल्याचे दिसून आले होते. त्यात दोन पाच ग्रम वजनाचे चांदीचे कॉईन, बार, बारा चांदीचे मॅरेज कॉईन सेट, कॉईन व बार, प्रत्येकी एक चांदीची बॉटल, प्युअर प्लेट, कामाक्ष दिपक, करंडा, लोटी, शिवलिंग सेट, थाली, तीन लेडीज पर्स, डायफ्रुटस बॉक्स, फिश, फॉर्क, ग्लास, दोन प्युअर बॉटल, चार चांदीचे प्युअर कटोरी, दोन चांदीचे लोटा, पाच चांदीच्या थाली, तीन चमचे, सहा दिवे, सरस्वती मातेची मूर्ती, सहा दिवे आदींचा समावेश होता.

हा प्रकार उघडकीस येताच राहुल मेहता यांनी शोरुममधील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. त्यात दिपेश जैन हा अनेकदा दुकानात आधी येत होता आणि दुकान बंद होण्याच्या वेळेनंतर उघडत होता. त्यानेच शोरुममधील विविध चांदीच्या वस्तू टप्याटप्याने चोरी केल्याचे दिसून आले. याबाबत शोरुमच्या खात्यासह नोंदीची पाहणी केल्यानंतर त्यात दिपेशने इलेक्ट्रीक रेकॉर्ड नष्ट करुन त्याजागी बोगस नोंद केल्याचे दिसून आले. रेकॉर्डमधून मालाच्या व्यवहाराच्या नोंदी काढून त्यात चुकीची नोंद केली होती.

बोगस मंजुरी व्हाऊचर्स तयार केले होते. बोगस तारखांसह वेळेचे डिलीव्हरी चलन यादी बनविले होते. अशा प्रकारे गेल्या वर्षभरात दिपेशने शोरुममधील व्यवहाराचे नोंद डिलीट करणे, बोगस डिलीव्हरी तयार करुन चांदीच्या विविध वस्तूचा अपहार केला होता. सॉफ्टवेअर चुकीच्या नोंद करुन राहुल मेहता यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.

प्राथमिक तपासात दिपेशने ऑक्टोंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत हा संपूर्ण आर्थिक गैरव्यवहार केला होता. याकामी त्याला शोरुममधील काही कर्मचार्‍यांनी मदत केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. हा प्रकार उघडकीस येताच राहुल मेहता यांनी कस्तुबा मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध आर्थिक व्यवहाराची बोगस नोंद करुन दोन कोटीच्या विविध चांदीच्या साहित्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. या कबुलीनंतर त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. दिपेश हा बोरिवलीतील गितांजली जैन मंदिर, साईबाबा नगर, दिव्या पर्शवा अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याच्याकडून अपहार केलेले काही चांदीचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले आहेत. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page